सार्वजनिक बांधकाम विभाग "बेशरम"झालाय काय? अंचरवाडीच्या तरुणांचा संतप्त सवाल! उपसरपंच सुनील परिहार,शिवसेना शाखाप्रमुख शिवा चव्हाणांच्या नेतृत्वात अभिनव आंदोलन..! 

रस्त्याच्या डबक्यात लावली बेशरमीची झाडे....
 
अंचरवाडी(ऋषी भोपळे:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): सार्वजनिक बांधकाम विभाग "बेशरम"झालाय काय? असा खडा सवाल अंचरवाडीच्या तरुणांनी केला आहे. नुसता सवाल करून थांबले नाहीत तर त्यांनी अभिनव पद्धतीने सार्वजनिक बांधकाम विभागाचा निषेध केलाय. अंचरवाडी - शेळगाव रस्त्यावरील गटारात बेशरमीची झाडे लावून त्यांनी आंदोलन आंदोलन केले. उपसरपंच सुनील परिहार तथा शिवसेनेचे शाखाप्रमुख शिवा चव्हाण यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले.
Related img

अंचरवाडी ते शेळगाव आटोळ या रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली आहे. अंचरवाडी गावातील बसस्टँड परिसरात तर रस्त्याला अक्षरशः गटाराचे स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यामुळे वाहने तर सोडा पायी चालणे देखील कठीण झाले आहे. गटारात एवढे पाणी साचल्यामुळे मच्छर आणि त्यामुळे साथीच्या आजारांनी थैमान घातले आहे. मात्र एवढे होऊनही सार्वजनिक बांधकाम विभाग मात्र झोपेचे सोंग घेत आहे. अंचरवाडी गावात देखील माणसेच राहतात..त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाचा निषेध म्हणून गटारात बेशरमाची झाडे लावल्याचे उपसरपंच सुनील परिहार यांनी सांगितले. पुढच्या ३ - ४ दिवसांत योग्य ती कार्यवाही न झाल्यास आम्ही डबक्यात बसून उपोषण करू असा इशाराही यावेळी तरुणांनी दिला. यावेळी शिवसेना शाखाप्रमुख शिवा चव्हाण, ज्ञानेश्वर चव्हाण, श्याम राठोड, राहुल परीहार, सागर परीहार, नारायण परिहार, शुभम इंगळे, विनोद परिहार यांच्यासह तरुणांची उपस्थिती होती.