"हर्ष" निश्चितच, पण होणार का काँग्रेसचे "वर्धन"..! राज्य हाती आले, हाती आणणार का राज्य? जेष्ठ पत्रकार राजेंद्र काळे लिहितात....
Feb 24, 2025, 14:25 IST
प्रदेशाध्यक्ष झालात दादा, ‘हर्ष’ निश्चितच आहे. पण विरोधक गल्लीपासून व्हाया मुंबई ते दिल्लीपर्यंत महाशक्तीशाली असल्यामुळे पुढं आव्हानंच नाहीतर, आव्हानांचे डोंगर आहे. विरोधकांशी दोन हात करता येतील. पण पक्षांतर्गत विरोधकांचे काय? कोणत्याही गटा-तटाचे तुम्ही समजले जात नसलेतरी, प्रदेशाध्यक्ष म्हणून तुमचा वेगळा गट निर्माण होईल.. त्याचे काय? नानाभाऊ पटोलेंचा आधी कुठे गट होता, पण प्रदेशाध्यक्ष झाल्यावर झालाच ना त्यांचा गट निर्माण? काँग्रेसमध्ये गटाचे राजकारण कायम चालत आले, म्हणून काँग्रेसचा तट कायम आहे. पक्षात स्पर्धा हव्याच, स्पर्धा आल्या की गट-तट ओघाने येणारच. दूरचं सोडा, घरचंच पहा- बुलढाणा जिल्ह्यात किती जणांना आनंद झाला तुमच्या निवडीचा? तरीही जिल्ह्यात आता काँग्रेस विधानसभेत संपलेली आहे. जिल्ह्यात महायुती जोरात आहे. बुलढाणा शहरातच बघा- मागच्या नगरपालिका निवडणुकीत ज्या प्रभागात काँग्रेसचे ३ प्रदेश उपाध्यक्ष होते, त्याही प्रभागात काँग्रेसचा एकही नगरसेवक निवडून आला. अगदी दादा तुम्ही राहता त्या प्रभागात व तुमच्या होमपीच असणार्या देऊळघाट जि.प.सर्कलमध्येही काँग्रेसचा पराभव झाला होता. त्यामुळे तुम्हाला संघटना वाढीची सुरुवात घराच्या दारापासून करावी लागणार आहे, तरच विधीमंडळावर काँग्रेसचा झेंडा फडकेल. तुम्ही बोललात, जे बोललं ते करुन दाखविण्याची जिद्द तुमच्यात आहे. त्यासाठी तुम्ही झोकूनही द्याल.. पण दादा ‘वाट’ कठीण आहे, सत्ता ही विरोधकांची ‘वाट’ लावणारी आहे.. त्यातून तुम्हाला सत्तेचा ‘पाट’ मिळवायचा आहे.. चला घाबरायचं नाही, महाराज घाबरले असतेतर ते मुघल सैन्यांशी कधीच लढले नसते, गेलेच नसते प्रतापगडावर.. मरणाला भित असतेतर. त्यांनी ‘स्वराज्य’ मिळवलं, तुम्हाला ‘राज्य’ मिळवायचं आहे. हर्षवर्धन सपकाळांच्या निवडीच्या या मातीतला अन् त्यातल्या त्यात मैदानाच्या लाल मातीतून आलेत म्हणून सर्वांनाच ‘हर्ष’ होणे स्वाभाविक आहे, पण आडवळणं पाहता प्रश्न आहेच-होणार का काँग्रेसचं ‘वर्धन’? त्यातून पुन्हा-पुन्हा प्रश्न पडतो- दादांसाठी.. राज्य हाती आले, आता ते हाती आणणार का राज्य?
‘सरफरोशी की तमन्ना अब दिल में है,
देखना है जोर बाजू-ए-कातील में कितना है..’
अशी सळसळणारी सुरुवात काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी करुन, थेट भाजपाला शिंगावर घेत ‘पुढचा मुख्यमंत्री काँग्रेसचाच..’ हे ‘लक्ष्य’ ठेवून केंद्रात अन् राज्यात सत्ता नसतांनाही लोकशाही थाटात प्रदेश काँग्रेसची कमान सांभाळली !
सर्वोदय परंपरेत राहूनही ‘इव्हेंट स्कील’ असणारे हर्षवर्धन सपकाळ, त्यामुळे पदभाराचा इव्हेंटही त्यांनी अगदी परफेक्ट केला. पदभार घेण्याआधी बुलढाणा जिल्ह्यातील व मुंबईतील श्रध्दास्थान अन् प्रेरणास्थानी जावून माथा टेकवला. शिवजयंतीच्या पुर्वसंध्येला गांधी-शाहू-फुले-आंबेडकर अन् तुकडोजींच्या विचारांचा वारसा जपणार्या एका सामान्य तरुणाला असामान्य प्रदेश नेतृत्वाचा दर्जा मिळाला. दुपारी टिळक भवन येथील काँग्रेस मुख्यालयात त्यांनी पदभार सांभाळला, अन् सायंकाळी बिर्ला मातोश्री सभागृहात पदग्रहण सोहळा दिमाखात पार पडला!
काँग्रेस सत्तेच्या बाहेर फेकली गेली असलीतरी, काँग्रेसच्या राजकीय वर्तुळाचे किती वजन आहे? हे हर्षवर्धन सपकाळांच्या पदग्रहण सोहळ्यातून ठळकपणे दिसले. बुलढाण्याच्या दोन ते तीन चौकात हर्षवर्धन सपकाळांच्या अभिनंदनाचे लागलेले बॅनर डोळ्यांनाही दिसणार नाहीत, इतके छोटे.. त्यापेक्षा आमदारांच्या नातीच्या वाढदिवसांचे फ्लेक्स कैकपट मोठे आहेत. पण मुंबईत लागलेले बंटीदादांच्या अभिनंदनाचे बॅनर्स-फ्लेक्स राज्याच्या राजकारणाचे लक्ष वेधणारे आहेत. अभुतपूर्व उत्साह होता पदग्रहण सोहळ्यात, खचाखच भरलेल्या बिर्ला मातोश्री सभागृह व बाहेरही कार्यकर्त्यांच्या गर्दीत चैतन्य ओसंडून वाहत होते. महाराष्ट्रातील दिग्गज काँग्रेस नेते सपकाळांची वाट पाहत मंचावर विराजमान होते. ‘एकच वादा-बंटीदादा’ घोषणेने सभागृह दणाणले होते. त्या सभागृहाततरी काँग्रेस सत्तेत असल्याचा भास, अन् सत्तेत येणार असल्याचा विश्वास वाटत होता. कार्यकर्ते रडण्यासाठी नाहीतर, लढण्यासाठी आलेले वाटत होते.. कारण त्यांना शस्त्र "म्यान" करुन ठेवणारा नव्हेतर, शस्त्राचे "बाण" करुन विरोधकांना घायाळ करुन सोडण्यासाठी सज्ज असलेला सेनापती भेटला आहे, त्याचेच नाव.. हर्षवर्धन भानुमती वसंतराव सपकाळ!
सरफरोशी की तमन्ना दिल में घेवून येत कातील के बाजूओं में कितना जोर है.. हे बघण्यासाठी हर्षवर्धन सपकाळ यांनी तिथेच ललकारी ठोकली. कोणती सशक्त भाजपा? बाळासाहेबांची शिवसेना व पवारांची राष्ट्रवादी फोडणारी. काँग्रेसच्या नेत्यांना पळवून पदे वाटणारी?? मग जर करोडोंमध्ये सदस्य नोंदणीचे आकडे आहेतर ही पळवा-पळवी कशाला??? असा थेट सवाल त्यांनी भाजपा नेतृत्वाला करुन तुम्ही सशक्त नाहीततर अशक्त आहात, असे ठणकावून सांगत.. मी रणांगणात उतरलो तेच मूळात लढण्यासाठी, सज्ज व्हा विरोधकांचा सामना करण्यासाठी.. पुढच्या ५ वर्षात आम्हीच सत्तेत राहू, मुख्यमंत्री कोण असेल? यापेक्षा मुख्यमंत्री आमचाच असेल.. असा अंदाज नव्हे, आव्हान नव्हेतर ठाम विश्वास व्यक्त केला व टाळ्यांनी सभागृह दणाणून सोडले.
हर्षवर्धन सपकाळ कोण आहेत? याचा माध्यमांमध्ये चघळून-चघळून चोथा झालेला आहे. सार्या राज्याला माहित झाले आहे, ते कोण आहेत? पण हर्षवर्धन सपकाळ ‘काय’ आहेत? हे एक पत्रकार म्हणून माझ्याइतके कोणालाही माहित नसणार?? हे आत्मप्रौढीचा दोष पत्करुन सांगतो. ते राष्ट्रीय काँग्रेसचे सचिव व राजीव गांधी पंचायत राज संघटनेचे अध्यक्ष झाल्यानंतर, त्यांचा बुलढाण्यात काँग्रेसच्या वतीने जो नागरी सत्कार झाला होता.. त्यावेळी एक पत्रकार म्हणून मनोगत मांडतांना मी म्हणालो होतो- ‘मृणालिनी वहिनी दादांसोबत जेवढ्या फिरल्या नसतील तेवढा मी फिरलो आहे. हा भला माणूस प्रचंड जिद्दी असून जे बोलतो ते करुन दाखवतो. त्यामुळे विधानसभेत सांगू शकत नाही, पण लोकसभेचे जर दादांना तिकीट मिळालेतर कोणाची कितीही लाट असू द्या, हा माणूस निवडून येईल. पण एक सांगतो पुढचा काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष बनण्याची क्षमता बंटीदादांमध्येच आहे, अन् तेच पुढचे प्रदेशाध्यक्ष असतील!’
दादा खरोखर प्रदेशाध्यक्ष झाले, अन् हे पद नव्हेतर संघटनात्मक ओझं सांभाळतांना त्यांनी ललकारी ठोकली- पुढचा मुख्यमंत्री काँग्रेसचाच!
हर्षवर्धन सपकाळ केवळ जिद्दी नाहीतर, ती जिद्द पुर्ण करण्यासाठी झोकून देण्याची क्षमता त्यांच्यात आहे. आमदार असतांनाही आपल्या सूटमधील बेड देवानंदभाऊ कायंदेंसारख्या वरिष्ठ माणसाला देवून, फरशीवर थंडीतही बेडशीट व अंगावर सतरंजी घेवून झोपणारा हा कार्यकर्ता. रेल्वेतही अनेकदा स्वत:चा बर्थ वरिष्ठांना देवून दोन सिटच्या मध्ये प्रसंगी पेपर अंथरुन झोपणारा हा माणूस. यात अतिशयोक्ती काहीच नाही, याहीपेक्षा अनेक मोठे प्रसंग आहेत. मृणालिनी वहिनी नवी नवरी म्हणून सपकाळ घराण्यात आल्या, त्याचं माहेर म्हणजे चौकटीतलं घराणं.. बंटीदादांचं किचन पकडून ३ रुमचं घर म्हणजे बुलढाणा बसस्थानक व हॉस्पीटल एरियातली धर्मशाळाच. दरवाजा २४ तास सताड उघडा.. सबके लिए खुला है मंदीर यह हमारा.. दादा देऊळघाट जि.प. सर्कलमध्ये सदस्य, त्यामुळे मुस्लीम कार्यकर्ते पाणी पिण्यासाठी घरातल्या माठाजवळ जायचे. एकदा घरी आलेल्या वहिनींच्या आईने हे बघितले- ‘अगं मृणाल, तुमच्या घरी हे असं कसं?’ वहिनी म्हणाल्या- ‘आई आमचं घर असंच..!’ वहिनी दादाच्या पुढं २ पाऊल पुढं निघाल्या. कधी-कधी दादातरी ‘अॅटीट्यूड’ मध्ये वाटतात. पण वहिनी कायम साध्या. आमदाराची बायको अन् स्वत: प्राध्यापक असतांनाही धुणी-भांडी करणार्या, फावल्या वेळात भिलवाड्यातल्या मुलींना हॉलमध्ये घेवून शिकवत बसणार्या. स्कुटीवर जिजामाता कॉलेजमध्ये जाणार्या वहिनी, आपला नवरा काय आहे? हे प्राचार्य व स्टाफ समोर जाणवू न देणार्या. म्हणतात ना, पुरुषांच्या यशात बायकोचा अर्धा वाटा असतो. मृणालिनी वहिनींच वाटा त्याहीपेक्षा मोठा. बरं पोरांमध्येही तेच गुण, कुठलेच अवगुण नसणारे गार्गी अन् यश. वडील प्रदेशाध्यक्ष झाल्यावर गार्गीने वडिलांसाठी लिहीलेलं पत्र मिडीयावर खूप गाजलं. गार्गी म्हणते- ‘बाबा तुम्ही इतकं काम करता,पण ते सोशल मिडीयावर कधीच टाकत नाही..’ गार्गी बाळा, तो अशा लेकीचा बाप आहे की जी लेकच तिच्या कामाचा गवगवा करत नाही. त्यांचे गुण तुझ्यात उतरले, तूच जे करत नाही.. नव्या फेसबुकीय पिढीची असतांनाही, ते तुझा बाप कसा करणार? गार्गीचं काम किती मोठं आहे, हा एक स्वतंत्र वार्तापत्राचा विषय आहे.. पण थोडक्यात सांगायचंतर- सैलानी इथे मनोरुग्णासाठी तिनं नि:शुल्क-निस्वार्थ केलेलं आरोग्यसेवेचं काम. कोरोनाच्या पहिल्या लाटेत डेंटीस्ट दवाखाने बंद होते व सर्वत्र भिती असल्यामुळे कोणीही कोरोना सेंटरमध्ये जावून रुग्णांचे स्वॅब घेण्यासाठी धजावत नसतांना, घराबाहेर पडून धाडसी काम करणारी तू पोरगी. एवढं करुनही कुठंही प्रसिध्दीसाठी पुढं न येणारी तू, अन् बापाला म्हणते कामाच्या पोस्ट टाकत नाही. कसा टाकणार? तो तर तुझा बाप! अर्थात, कोरोना काळाच्या कामासाठी या बाप-लेकीची वेगळी स्टोरी व्हावी.. एवढा मोठा एपिसोड आहे! अरे हो.. पोराचं राहिलं. तसाही यशवर्धन मागेच असतो, कधी पुढे येतच नाही. घरी कोणी गेलंतरी दादाला त्याची ओळख करुन द्यावी लागते- हा माझा पोरगा. इतका तो साधा, पण कामात तो बापापेक्षाही भारी. त्याचा साधेपणाचा किस्सा.. वडील आमदार असतांनाही यश हा आरटीओ. ऑफीमध्ये ड्रायव्हींग लायसन्स काढण्यासाठी रांगेत उभा होता. कुणीतरी त्याला ओळखलं अन् पुढे घेवून जाण्याचा प्रयत्न केला, तर ‘नको काका, आता लवकर नंबर येईल..’असं रांग न मोडणारं हे कुटुंब!
जावू द्या, अनेक किस्से आहे. एखादं पुस्तक निघेल एवढे. घरातून राजकारणावर येऊया. संत तुकडोजींच्या ग्रामस्वच्छतेचा वसा व वारसा घेऊन सर्वोदयी विचाराने हर्षवर्धन सपकाळ निघाले होते खेड्याकडे, पण नेतृत्वाने त्यांना सांगितले- राजधानीत या.. त्यांना या २ वर्षात खासदार किंवा आमदार बनायचं होतं, पण पक्षानं तिकीट दिलं नाही. बरं झालं, नाहीतर तुम्ही प्रदेशाध्यक्ष बनले नसते.. जो होता है वो अच्छे के लिए होता है. तुम्ही ४ निवडणुका लढलात, ३ जिंकल्या व १ हरलात. ६ निवडणुका पक्षानं तिकीट न दिल्यामुळे तुम्ही लढायच्या राहून गेलात, हे तुम्हीच सांगितलं त्या भाषणातून.. ही खंत होती की रोष? मुलीचं लग्न करायचं होतं, पण फेलोशीप मिळाल्याने ती विदेशात शिक्षणासाठी गेली. दादा तुम्ही तिचं नावंच ठेवलय गार्गी, कर्तृत्वालाच प्राधान्य देणार ती.. नावात काय आहे? शेक्सपियर म्हणाला होता, नावात बरंच काही असतं. दादा मार्गी नावात खूप काही आहे. तर या वर्षात तुम्हाला नव्या घरात राहायला जायंच होतं. तुम्ही गेलात, ज्या घराचं काम १२ वर्ष चाललं त्या घरात. अर्थात इतकं वर्ष काम चालायला ते एवढं मोठं घर नाही, पण तुम्ही आधी जोतं बांधलं मग धाब्यात पाणी मुरु दिलं.. कदाचित या घर बांधण्याच्या संकल्पना एक-दोन वर्षात उपलब्ध न होणारा पैसा, यामुळे रखडत बनलेल्या असाव्यात. सद्यस्थितीत महाराष्ट्रात तुम्ही एकमेव नेता असाल, की जो उत्तर देवू शकतो अशा प्रश्नाचं जो प्रश्न म्हण बनला आहे तो.. घर पहावं बांधून? तुमच्या घरावरचं एक चित्रपट बनेल, तसंही दादाचं घर म्हणजे.. एका चित्रपटाचं लोकेशनच!
दादा, तुम्ही बोलत होता मुंबईतल्या भव्य पदग्रहण सोहळ्यात. तुम्ही तुमचा प्रवास मांडत होता, लाभलेला सहवास सांगत होता अन् पक्षबांधणीचा विश्वास व्यक्त करत होता. तसं आता राहिलंतरी काय काँग्रेसमध्ये? देशात जी नामशेष व्हायची ती होवून गेली काँग्रेस, अन् महाराष्ट्रात जो काय बट्ट्याबोळ व्हायचा तोही होवून गेला काँग्रेसचा. ‘काँग्रेस जला दी हमने, जब जैसा जलानी थी.. अब धुअें पर तमाशा कैसा, और राख पर बहस कैसी ?’ अशा भावना असतील सरंजामदार नेत्यांचा. राख झाली आहे दादा काँग्रेसची, म्हणून तर कोणी प्रदेशाध्यक्ष बनायला तयार नव्हते.. अशा चर्चा आहे. अर्थात अनेकजण तयार होते, यशोमती ठाकूर-सतेज पाटील यांच्यासारखे. पण राहुल गांधींना महाराष्ट्रात रेवंथ रेड्डी उभा करायचा होता, की ज्याने तेलंगणात सत्ताधार्यांना भिक घातली नाही.. तसाच सत्तेशी अॅडजेस्ट न करणारा प्रदेशाध्यक्ष काँग्रेसला हवा होता, व तो त्यांना दिसला- हर्षवर्धन सपकाळ यांच्यात. म्हणून राहुल गांधींनी ही निवड करतांना महाराष्ट्रातल्या कोणत्याही नेत्यांना विचारलं नाही, अगदी मुकुल वासनिकांनासुध्दा!
थेट दिल्लीहून नावं आलं, गल्लीतले हर्षवर्धन सपकाळ मुंबईत पोहचले. आता इथंही साधेपणा आहे, पदभार घ्यायला गेल्यावर ताज-ओबेरॉयमध्ये थांबायचं ना... प्रदेशाध्यक्ष बनल्यावर बाप जाद्याची इस्टेट असल्यासारखी काँग्रेस लुटून खायची ना? पण हा भला माणूस मुक्कामाला थांबला गिरगावातल्या सर्वोदय आश्रमात बायकोसह. मुंबईत असणार्या एवâा बुलढाणा जिल्ह्यातल्या वरिष्ठ पत्रकारानं मुलाखत घेण्यासाठी त्यांना कॉल केला तेंव्हा हे कळालं. मी अनेकदा मुंबईत याच आश्रमात मुक्कामी असतो, असं तेंव्हा बंटीदादांनी पहिल्यांदा सांगितलं.
मंगळवार १८ फेब्रुवारीला पदग्रहण सोहळा पार पडला. यावेळी प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी महाराष्ट्रात हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात काँग्रेस पुन्हा गतवैभव प्राप्त करेल, असा विश्वास व्यक्त केला. यावेळी माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे व पृथ्वीराज चव्हाण, विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात, माणिकराव ठाकरे, वर्षा गायकवाड, नसीमखान, चंद्रकांत हंडोरे, शिवाजीराव मोघे, अमित देशमुख, यशोमती ठाकूर, असलम शेख, प्रणिती शिंदे आदी दिग्गज नेतेमंडळी उपस्थित होती. तर पदभार घेतांना मुकुल वासनिक हेही उपस्थित होते. पण ते पदग्रहण सोहळ्यासाठी व्यस्ततेमुळे पोहचू शकले नाही. उपस्थित सारेच सपकाळांवर भरभरुन बोलले. पक्षाच्या सद्यस्थितीवर चिंतन-मंथन झाले. महाराष्ट्रात बट्ट्याबोळ झालेल्या काँग्रेसचा ठपका अनेकांनी ईव्हीएम वर ठेवला. भाजपाने मतांची चोरी करुन सत्ता आणल्याचे मावळते प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले. सर्वोदयी तत्वज्ञान व गांधी विचाराने काम करणार्या हर्षवर्धन सपकाळ यांच्या रुपाने काँग्रेसमध्ये एका नव्या पर्वाला सुरुवात होत असल्याचे बाळासाहेब थोरात म्हणाले. विजय वडेट्टीवार यांनी काँग्रेस पक्ष कधीच संपणारा नसून पुर्ववैभव प्राप्त करण्यासाठी लढाऊ इच्छाशक्तीची अपेक्षा व्यक्त केली. अनेक भाषणांनी सोहळा रंगला.. अन् काँग्रेसमध्ये एका नव्या "हर्ष"पर्वाला सुरुवात झाली !