GOOD NEWS! चिखली विधानसभा मतदारसंघातील १२७ योजनाबाह्य रस्त्यांना आता ग्रामीण रस्त्यांची मान्यता! आमदार श्वेताताईंच्या प्रयत्नांनी पांदण रस्त्याच्या विकासाचा मार्ग मोकळा! शेतकरी होणार समृद्ध

 
चिखली( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  चिखली आणि बुलडाणा तालुक्यातील आतापर्यंत दुर्लक्षित राहिलेल्या तब्बल ४५५ किलोमीटर लांबीच्या १२७ पांदन किंवा दोन गावांना जोडणाऱ्या योजना बाह्य रस्त्यांना ग्रामीण रस्ते म्हणून शासनाने मान्यता दिली आहे. आ. श्वेताताई महाले यांनी यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांमुळेच ग्रामीण तसेच पांदण रस्त्यांच्या विकासातील फार मोठा अडथळा दूर होऊन रस्ते सुधारण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.

पांदण रस्ते म्हणजे शेतकऱ्यांच्या विकासाची नाडी, रस्ते चांगले असले तरच शेतकऱ्यांना शेतात जाणे येणे सोईचे होते. शेती आधुनिक झाल्याने बहुतांश शेती यंत्राच्या माध्यमातून केल्या जाते. त्यामुळे शेतात जाण्या येण्यासाठी वाहनांचा उपयोग होतो. त्यामुळे पांदण रस्ते चांगले असणे आवश्यक आहे. हीच बाब हेरून आ. श्र्वेताताई महाले यांनी चिखली विधानसभा मतदारसंघातील पांदण रस्त्यांच्या विकास करण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. शासनाकडे त्या सातत्याने पाठपुरावा करीत होत्या. पांदण रस्ते योजनाबाह्य असल्याने अशा रस्त्यांसाठी कोणताही शासकीय निधी दिल्या जात नाही. मात्र आ. श्वेताताईंच्या प्रयत्नांनी हा अडथळा दूर झाला. 

आता चिखली विधानसभा मतदारसंघातील ४५५ किलोमिटर लांबीच्या १२७ रस्त्यांना ग्रामीण रस्त्यांचा दर्जा प्राप्त झाल्याने  . आतापर्यंत दुर्लक्षित राहिलेल्या रस्त्यांच्या विकासाचा मार्ग मोकळा झालाय. दरम्यान आता या रस्त्यांच्या विकासावर भर देण्यात येणार असून त्यासाठी निधी आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आ. श्वेताताई महाले पाटील यांनी सांगितले आहे.