१७ हजार मतदार ठरवणार चार नगरसेवक; खामगावमध्ये पोटनिवडणुकीची रंगत, चार प्रभागांत शनिवारी मतदान; १८ मतदान केंद्रांवर यंत्रे सील, राजकीय हालचालींना वेग...
निवडणूक प्रक्रियेतील महत्त्वाचा टप्पा म्हणून चार प्रभागांसाठी वापरण्यात येणारी मतदान यंत्रे मंगळवारी सकाळी ११ वाजता अधिकृतपणे सील करण्यात आली. चार प्रभागांसाठी एकूण १८ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली असून, तेवढीच मतदान यंत्रे वापरण्यात येणार आहेत. संभाव्य तांत्रिक अडचणी लक्षात घेता चार मतदान यंत्रे राखीव ठेवण्यात आली आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. रामेश्वर पुरी आणि सहायक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. प्रशांत शेळके यांच्या उपस्थितीत प्रशासकीय इमारतीलगत असलेल्या महात्मा गांधी सभागृहात उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींसमोर मतदान यंत्रांची तपासणी करून ती सील करण्यात आली. संपूर्ण प्रक्रिया निवडणूक यंत्रणेच्या देखरेखीखाली पारदर्शक पद्धतीने पार पडल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
प्रभागनिहाय मतदार संख्या :
प्रभाग ५ : ४,५०७ मतदार
प्रभाग ७ : ३,८४० मतदार
प्रभाग ९ : ४,३१५ मतदार
प्रभाग १६ : ४,४८५ मतदार