श्वेताताई महालेंसाठी ग्राउंड रियालिटीवर गोतावळ्याचा फॅक्टर ठरणार महत्त्वाचा !
तोरणवाडा आणि मेरा बुद्रुक परिघातील नातलगांचा जिल्हाभर गोतावळा ...

 
 चिखली: जिल्ह्याची राजकीय राजधानी म्हणून परिचित असलेल्या चिखली विधानसभा मतदारसंघांमध्ये दोन जुनेच प्रतिस्पर्धी समोरासमोर आलेले आहेत. ताई आणि भाऊ यांच्यातली ही लढत उत्कंठावर्धक शिगेला पोहोचलेली असताना ग्राउंड रियालिटीवर गोतावळ्याचा फॅक्टर हा महत्त्वाचा ठरणार आहे. श्वेताताई महालेंसाठी तोरणवाडा आणि मेरा बुद्रुक परिघातील नातलगांचा जिल्हाभर असलेला गोतावळा हा गेमचेंजर ची भूमिका नक्कीच निभाऊ शकतो असं राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

चिखली विधानसभा मतदारसंघांमध्ये चिखली हेच तालुका मुख्यालय आहे. बहुतांश ठिकाणी एका विधानसभा मतदारसंघांमध्ये दोन दोन तालुका मुख्यालये येतात. चिखलीच्या शेजारी असलेला बुलडाणा सिंदखेडराजा किंवा मेहकर या मतदारसंघांमध्ये दोन -दोन तालुक्यांचा समावेश आहे. चिखली मध्ये बहुतांश ग्रामीण भागाचा दररोजचा वापर हा तालुका मुख्यालयात चिखलीशी जोडलेला आहे. त्यामुळे नेहमीप्रमाणे गजबजलेला आणि थेट संपर्कात असलेला चिखली शहराचा बाज हा राजकीय दृष्ट्या चर्चेतच असतो. चिखली विधानसभा मतदारसंघ तसा पाहिला तर महिला नेतृत्वाला साथ देत आलेला आहे. गेल्या तीन दशकातील आकडे याची समर्थपणे साक्ष देत देतात. चिखली विधानसभा मतदारसंघातच नव्हे तर जिल्ह्याच्या सिंचनाच्या सुविधेला नव्या उंचीवर नेत शेतीमातीत पाणी मुरवणारा माणूस म्हणजे भारत भाऊ बोंद्रे. त्यांची साथ देखील सद्यस्थितीत श्वेताताई महाले यांच्या बाजूने आहे. चिखली विधानसभा मतदारसंघांमध्ये १९९५ ते तीन टर्म रेखाताई खेडेकर यांनी या मतदारसंघाचे नेतृत्व केले. एक दोन अपवाद वगळता श्वेताताई महाले यांच्या रूपाने भाजपने पुन्हा कमबॅक केले. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ढवळून निघालेले समाजकारण, चिखली मध्ये रुजलेली वैचारिक पाळेमुळे आणि त्यातही ग्रामीण भागात बहुसंख्येने असलेला नातलगांचा गोतावळा या बाबी प्रकाशाने निवडणुकीच्या एकूण प्रचारावर परिणाम करणाऱ्या ठरतात हे विसरून चालणार नाही. श्वेताताई महाले यांचे माहेर असलेले मेरा बुद्रुक अर्थात पडघान परिवार आणि तोरणवाड्याचा महाले परिवार यांचे सामाजिक आणि राजकीय घटकात ऋणानुबंध मोठे आहेत. विशेष म्हणजे समाजाच्या सुखदुःखाची पिढ्यान पिढ्या असलेले सोयर-संबंध जपून असलेले हे दोन्ही परिवार राजकीय दष्ट्या तेवढे तगडे आहेत . 
  जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राजकारणात सक्रिय झालेल्या श्वेताताई महाले यांना सभापतीपद भाजपने दिले आणि नंतर लगेच २०१९ विधानसभा निवडणुकीत त्यांना उमेदवारी देखील दिली. रेणुका नगरी असलेल्या चिखलीने महिला उमेदवाराला साथ दिली आणि बदल घडला. तीन दशकातला इतिहास पाहिला तर दोन अपवाद वगळता चार वेळा महिला उमेदवाराला चिखली विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदारांनी संधी दिल्याचे दिसून आले आहे. यात महत्त्वाचा फॅक्टर हा नातलगांचा गोतावळा ठरतो. श्वेताताई महाले यांच्या पारड्यात हा गोतावळा हे वजन ठेवून आहे. त्यामुळे प्रचाराच्या धामधुमितही त्याचे दृश्य परिणाम प्रकर्षाने जाणवतात.