जयश्रीताई शेळकेंसाठी
महाविकास आघाडीने वज्रमुठ आवळली!
राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्ष रेखाताई खेडेकर म्हणाल्या, जयश्रीताई रेकॉर्डब्रेक मतांनी विजयी होतील! नरेंद्र खेडेकर म्हणाले, गद्दारांना गाडण्यासाठी कामाला लागा...
Oct 27, 2024, 21:02 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मातृतीर्थ बुलडाणा जिल्ह्यात जयश्रीताईंच्या रूपाने जिजाऊंच्या लेकीला उमेदवारी मिळणे ही अभिमानाची आणि गौरवाची बाब आहे. गेल्या पाच वर्षात बुलडाणा विधानसभा मतदारसंघात काय झालं.. काय होतंय हे तुम्हाला वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही.. त्यामुळे इथे खऱ्या अर्थाने संयमी नेतृत्वाची गरज आहे. जयश्रीताई शेळके यांच्या विजयासाठी आपल्या सर्वांना प्रयत्न करायचे आहेत. गावोगावी जाऊन कार्यकर्त्यांना बैठका घ्याव्या लागतील, घरोघरी जाऊन मतदानाचे महत्त्व समजावून सांगावे लागेल. महाविकास आघाडीने आपली पूर्ण शक्ती जयश्री ताईंच्या पाठीशी उभी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते ही जयश्रीताईंच्या विजयासाठी दिवस-रात्र मेहनत घेतील. आपल्या सर्वांच्या मेहनतीचे फळ आपल्याला २३ नोव्हेंबरला मिळणार असून जयश्रीताई शेळके या रेकॉर्ड ब्रेक मतांनी विजयी होतील असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार सौ. रेखाताई खेडेकर यांनी व्यक्त केला. बुलडाणा येथील राष्ट्रवादी भवनात जयश्रीताई शेळके यांच्या प्रचार नियोजनासाठी महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची एकत्रित बैठक पार पडली या बैठकीला संबोधित करताना त्या बोलत होत्या. यावेळी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष ॲड. गणेश पाटील, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल बोंद्रे, शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख नरेंद्र खेडेकर, जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवंत, काँग्रेस नेते विजय अंभोरे, शिवसेना महिला जिल्हा आघाडीच्या प्रमुख चंदाताई बढे ,बुलडाणा विधानसभेच्या महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार जयश्रीताई शेळके, जिल्हा परिषदेचे माजी सभापती दिलीप जाधव, बी.टी.जाधव यांच्यासह महाविकास आघाडीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
पुढे बोलताना रेखाताई म्हणाल्या गेल्या अडीच वर्षात महाराष्ट्राची अवस्था अतिशय बिकट झाली. शेतकऱ्यांच्या आत्महत्या, कर्जबाजारीपणा, महिलांवरील अत्याचार वाढले. मात्र खोके सरकारला काही देणे घेणे नाही. त्यामुळे हे चित्र बदलायचे असेल सर्वसामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन आणायचे असेल तर महाविकास आघाडी शिवाय पर्याय नाही. महाविकास आघाडी सरकार सत्तेत येत असताना विधानसभेत बुलडाणा येथून जयश्रीताई शेळके यांचे प्रतिनिधित्व असलेच पाहिजे असेही त्या म्हणाल्या.
प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष ॲड. गणेश पाटील म्हणाले की, बूथ रचनेवर भर द्या, आपापल्या बूथवर १०० टक्के मतदान कसे होईल आणि जास्तीत जास्त मतदान हे महाविकास आघाडी सरकारच्या पारड्यात कसे पडेल यासाठीचे नियोजन आपल्याला करावे लागेल असे ते पदाधिकाऱ्यांना उद्देशून म्हणाले.
शिवसेना जिल्हाप्रमुख नरेंद्र खेडेकर यांनी आपल्या भाषणातून विद्यमान आमदार संजय गायकवाड यांच्यावर तोफ डागली. बुलडाण्यात हुकूमशाही सुरू आहे की काय? असा सवाल करीत गद्दारांना गाडण्यासाठी कामाला लागा असे ते म्हणाले.
जिल्हा काँग्रेस अध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी महाविकास आघाडीच्या विजयासाठी एकजूट महत्वाची असल्याचे विधान करीत, सध्या हुकूमशाही संपवणे हेच आपल्या सर्वांचे लक्ष असले पाहिजे असे प्रतिपादन केले. शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवंत यांनी शिवसेनेची अख्खी ताकद जयश्री ताईंच्या पाठीशी असल्याचे सांगितले.