पिकविमा मिळवून दिल्याबद्ल पळसखेडवासीयांनी केला तुपकरांचा जंगी सत्कार; रविकांत तुपकर म्हणाले, आंदोलनाचे यश शेतकऱ्यांच्या आनंदात ...
रविकांत तुपकरांचे गावात आगमण होताच ढोलताशाच्या गजरात आणि जेसीबीने फुलं उधळत स्वागत करण्यात आले. त्यानंतर गावातून मिरवणूक काढण्यात आली. या दरम्यान महिलांनी ठिकठिकाणी त्यांचे औक्षण केले. गावकऱ्यांच्या वतीने तुपकर यांचा नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी विनायक सरनाईक, नितीन राजपूत, ॲड. राज शेख, मोहम्मद अजहर, रामेश्वर अंभोरे, सुरेश ढोणे, भारत जोगदंडे, प्रशांत डोंगरदिवे, राजू जवंजाळ, अशोक सुरडकर, अनिल चव्हाण, रविराज टाले, पवन चव्हाण यांच्यासह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. सत्काराला उत्तर देताना रविकांत तुपकर पुढे म्हणाले की, आंदोलनामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिकविमा व अतिवृष्टीची मदत मिळाल्याने आंदोलन यशस्वी झाले. शेतकऱ्यांचे आंदोलन आणि शेतकरी चळवळ दडपण्याचे काम सत्ताधारी करत आहेत, पोलिसांच्या माध्यमातून त्यांनी प्रत्येकवेळी आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला परंतु शेतकऱ्यांसाठी पोलीस कारवाईला सामोरे जात आपण आंदोलनाची भूमिका कायम ठेवली. गावकऱ्यांनी प्रेमाने केलेल्या या भव्य सत्काराने मी भारावून गेलो. सर्व शेतकऱ्यांच्या एकजुटीमुळे आंदोलनाच्या जोरावर आपण शेतकऱ्यांच्या पदरात दोन पैसे पाडू शकलो याचा आनंद आहे. गावकऱ्यांनी केलेल्या सत्कारामुळे मला व माझ्या सहकाऱ्यांना पुढच्या लढ्यासाठी दहा हत्तीचं बळ मिळाले, असेही यावेळी रविकांत तुपकर यांनी सांगितले. कार्यक्रमाला गावातील नागरिक, महिला आणि विशेष करुन युवकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
उर्वरित १३ कोटी ३९ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात जमा
रविकांत तुपकरांच्या मुंबई येथे १६ जून रोजी होणाऱ्या आंदोलनाच्या धसक्याने ए.आय.सी. पिकविमा कंपनी जिल्ह्यातील ५० हजार ७५७ शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार १३ जून रोजी ४३ हजार ५८ शेतकऱ्यांच्या खात्यावर ५६ कोटी ७५ लाख रुपये जमा केले. पण संपूर्ण पैसे जमा होईपर्यंत आंदोलनावर ठाम असल्याची भूमिका तुपकरांनी घेतली होती. त्यानंतर कृषि अधिक्षकांनी पैसे जमा करण्याचे आश्वासन दिले होते व काल उर्वरित ७ हजार ८५५ शेतकऱ्यांच्या खात्यावर १३ कोटी ३९ लाख रुपये जमा झाले, हे तुपकरांच्या आंदोलनाचे मोठे यश आहे. पण जिल्ह्यात एक हजार पेक्षा कमी रक्कम मिळालेल्या शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे त्या शेतकऱ्यांना सन्मानजनक रक्कम, उशीरा तक्रारी केल्याच्या नावाखाली अपात्र केलेल्या शेतकऱ्यांना व त्रुटी मध्ये असणाऱ्या शेतकऱ्यांना तातडीने पिकविमा मिळण्यासाठी आपला लढा सुरूच रहाणार असल्याचे तुपकरांनी सांगितले आहे.