खामगाव- जालना रेल्वेमार्गाचे अंतिम सर्वेक्षण होणार!

केंद्राने दिले ३ कोटी ८७ लाख; मंत्री रावसाहेब दानवेंची माहिती
 
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बुलडाणा जिल्हावासीयांचे स्वप्न असलेल्या खामगाव- जालना रेल्वेमार्गाच्या अंतिम सर्वेक्षणासाठी केंद्र सरकारने ३ कोटी ८७ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. लवकरच या रेल्वेमार्गाचे अंतिम सर्वेक्षण होईल आणि त्यानंतर लगेचच कामाला सुरुवात करण्याचा प्रयत्न आहे, अशी माहिती केंद्रीय रेल्वेराज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली. जालना रेल्वेस्‍टेशनवर दोन नवीन गाड्यांना हिरवी झेंडी दाखविण्यासाठी आले असता त्‍यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
खामगाव- जालना रेल्वेमार्ग व्हावा ही ब्रिटिश काळापासूनची इच्छा आहे. या मार्गासाठी आतापर्यंत तीनदा सर्वेक्षण झाले. मात्र हा मार्ग रेल्वेसाठी उत्पन्‍नाचा नाही असे अहवाल आले होते. आता पुन्हा एकदा खामगाव- जालना या १५५ कि.मी.च्या मार्गाचे अंतिम सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे दानवे यांनी सांगितले. याआधी २७ डिसेंबर रोजी बुलडाणा जिल्ह्यातील लोकप्रतींनिधीची बैठक दानवे यांनी मुंबईत घेतली होती. तेव्हा केंद्र सरकार केंद्राचा वाटा द्यायला तयार आहे. मात्र राज्याने अजून आवश्यक ती कारवाई केली नसल्याचे सांगितले होते. खामगाव- जालना रेल्वमार्गासाठी सद्यःस्थितीत २ हजार १६ कोटी रुपयांचा खर्च लागणार असल्याचेही दानवे म्हणाले होते.