फसवणूक करणाऱ्या गाडे बंधूंवर गुन्हा दाखल करून अटक करा! अन्यायग्रस्त शेतकऱ्यांना घेवून रविकांत तुपकरांनी घेतली जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट
चिखली तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपला शेतमाल व्यापारी संतोष गाडे व त्यांच्या बंधूंना विकला होता. मात्र, त्यांनी आपले पैसे आरटीजीएस करतो किंवा काही दिवसांनी देतो म्हणत शेतकऱ्यांचे पैसे थकवले. यासंदर्भात शेतकरी तक्रारी करत आहेत. रविकांत तुपकर यांनी यापूर्वीच ११ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन सदर व्यापाऱ्यांविरोधात कारवाईची मागणी केली आहे. दरम्यान गेल्या तीन-चार दिवसांपासून ते शेतकऱ्यांच्या संपर्कात असून १५ एप्रिल रोजी देखील त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. शेतकऱ्यांसह जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन व्यापाऱ्यांवर कारवाईची मागणी केली. गेल्या काही वर्षांपासून काही व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची फसवणूक होण्याचे प्रमाण वाढले आहे.
फसवणुकीच्या प्रकाराला आळा घालण्यासाठी कायद्यात दुरुस्ती करणे गरजेचे आहे. तसेच ज्यावेळी शेतकरी व्यापाऱ्यांना आपला माल देतो, तेव्हा व्यापाऱ्यांचा आरटीजीएस करण्याचा आग्रह असतो. त्याऐवजी रोखीने पैसे मिळण्याची व्यवस्था असावी. चिखली तालुका व परिसरातील शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांवर कारवाई होणे गरजेचे आहे. त्या व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करुन त्यांना अटक करावी, अशी मागणी रविकांत तुपकर यांनी केली आहे.i