"पडदानशिन' मतदारांसाठी महिला कर्मचारी नियुक्त!

आयोगाचे निर्देश; एकूण 22 मतदान केंद्र, 66 कर्मचारी नियुक्त;  विधान परिषद निवडणूक
 
 
बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः विधान परिषदेच्या अकोला- बुलडाणा- वाशिम स्थानिक स्वराज्य मतदारसंघाच्या येत्या १० डिसेंबरला होऊ घातलेल्या निवडणुकीच्या मतदानाची प्रशासनाने जय्यत तयारी चालविली आहे. मतदान करणाऱ्या पडदानशीन मतदारांसाठी महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती हे यंदाच्या मतदानाचे एक वैशिष्ट्य ठरले आहे.

अत्यंत गुप्तपणे प्रचार होणाऱ्या या निवडणुकीत एकूण 821 मतदार असून यात सर्वाधिक म्हणजे 367 मतदार बुलडाणा जिल्ह्यातील आहेत. यामुळे अर्थातच जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे 11 मतदान केंद्र असून, मोताळा व संग्रामपूर वगळता अन्य 11 तालुकास्थळी ही केंद्रे राहणार आहे. मतदारसंघातील मुस्लिम महिला मतदारांचे मतदान लक्षात घेता आयोगाच्या निर्देशानुसार त्यांची पडताळणी करण्यासाठी प्रत्येक केंद्रांवर महिला कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहे. मतदान प्रतिनिधीने हरकत घेतल्यास व अन्य परिस्थितीत या कर्मचारी ओळख पटविण्याची कामगिरी बजावणार आहे. मतदारसंघातील केवळ 2 केंद्रावर मुस्लिम मतदार नसून, उर्वरित 20 केंद्रावर मुस्लिम मतदार आहेत. यामुळे या समाजाचे मतदान देखील एक निर्णायक  घटक आहे, हे विशेष.