शेतकऱ्यांनी रविकांत तुपकरांवर केला फुलांचा वर्षाव! पिकविमा व नुकसान मिळवून दिल्याबद्दल उत्स्फूर्त सत्कार
सोयाबीन-कापसाला दरवाढ, पिकविमा, सततचा पाऊस आणि अतिवृष्टीची नुकसान भरपाई, पिककर्ज यासह शेतकऱ्यांच्या महत्वपूर्ण मागण्यांसाठी रविकांत तुपकर सातत्याने लढा देत आहेत. एल्गार मोर्चा आणि त्यानंतर मुंबईतील जलसमाधी आंदोलन, त्यानंतर जिल्हा कृषी अधीक्षक यांच्या कार्यालयात मुक्काम, आत्मदहन आंदोलनाच्या माध्यमातून रविकांत तुपकर यांनी शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची रक्कम मिळवून दिली आहे. तर आता पुन्हा एकदा त्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले होते. १५ जून पर्यंत शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास १६ जून रोजी हजारो शेतकऱ्यांसह मुंबईत धडक देऊन एआयसी विमा कंपनीच्या २० व्या मजल्यावरील कार्यालयातून खाली उड्या मारु असा गंभीर इशारा देत त्या आंदोलनाची तयारही सुरु केली होती. या पार्श्वभूमिवर पोलिसांनी त्यांना १४ जून रोजीच ताब्यात घेतले होते. दरम्यान या आंदोलनाच्या धसक्याने एआयसी पिकविमा कंपनीने जिल्ह्यातील ५०,७५७ शेतकऱ्यांच्या खात्यावर ७० कोटी रुपये जमा करण्याचे लेखी आश्वासन दिले असून त्यापैकी ४३ हजार ५८ शेतकऱ्यांच्या खात्यावर ५६ कोटी ७५ लाख रुपये जमा झाले आहे व उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात देखील पैसे जमा होत आहे, हे या आंदोलनाचे मोठे यश ठरले आहे. शिवाय इतरही बहुतांश मागण्या शासनाने मान्य केल्या आहेत. पोलिसांनी तुपकर यांची सुटका करताच १५ जून रोजी तुपकर सकाळी लोकांना भेटण्यासाठी स्वाभिमानी हेल्पलाईन सेंटरवर आले असता हेल्पलाईन सेंटरसमोर शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त गर्दी करत तुपकरांचे उत्स्फूर्त स्वागत केले. यावेळी रविकांत तुपकर यांच्यावर पुष्पवृष्टी करुन त्यांचा तमाम शेतकऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. आजवर प्रत्येक आंदोलनात शेतकऱ्यांनी मोठे पाठबळ दिले आहे. त्यामुळेच मी शेतकऱ्यांसाठी लढा लढू शकलो. आंदोलनाला आलेले यश हे शेतकरी एकजुटीचा विजय आहे, असे प्रतिपादन यावेळी सत्काराला उत्तर देताना रविकांत तुपकर यांनी केले. शेतकरी हितासाठी आपण कटिबद्ध आहे. यापुढेही शेतकऱ्यांचा लढा ताकदीने सुरु राहील, अशी ग्वाही देखील त्यांनी दिली.