बोगस बियाण्यांनी शेतकरी उद्ध्वस्त; कंपन्यांवर कारवाईसाठी महालेंचा हल्लाबोल
मका बियाणे घोटाळा उघड; शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान, भरपाईची मागणी तीव्र...

 
 चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : तालुक्यात बोगस मका बियाण्यांच्या प्रकरणामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, या गंभीर प्रकारावर आमदार श्वेता महाले यांनी विधिमंडळात थेट आवाज उठवत संबंधित कंपन्यांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. “शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांना पाठीशी घालणार नाही,” असा स्पष्ट इशारा देत त्यांनी शासनाला धारेवर धरले.
एकलारा, शिरपूर आणि धाड येथील शेतकऱ्यांनी खरेदी केलेले मका बियाणे बोगस निघाल्याने पिकांचे अक्षरशः नुकसान झाले आहे. कंपनीने बीज उत्पादन कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांना मोठ्या आश्वासनांची खैरात केली होती. प्रति एकर ४५ क्विंटल उत्पादन आणि प्रतिक्विंटल ३ हजार रुपये हमीभाव देण्याचे आश्वासन देत शेतकऱ्यांना करारात अडकवले गेले. मात्र प्रत्यक्षात पिकाच्या कणसांमध्ये दाणेच भरले नाहीत, अशी धक्कादायक बाब समोर आली आहे.
याशिवाय, तुरे काढण्यासाठी प्रति एकर ३ हजार रुपये आणि औषधांसाठी १२ हजार रुपये देण्याचे आश्वासनही कंपनीने पाळले नाही. परिणामी, शेतकऱ्यांचे दुहेरी नुकसान झाले आहे. काही ठिकाणी एकरी ५ क्विंटल उत्पादनही मिळणार नाही, अशी भीषण परिस्थिती आहे. धाड येथील शेतकरी नितीन बारोड यांच्या शेतात तर कणसेच न लागल्याने संपूर्ण पीक वाया गेले आहे.
या प्रकाराची तक्रार कृषी विभागाकडे करण्यात आली असली तरी कारवाईत होत असलेला विलंब संताप वाढवणारा ठरत आहे. महाले यांनी या कंपन्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करून नुकसान भरपाई थेट कंपनीकडून वसूल करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, चिखलीतील बॉम्बे मार्केटमध्ये लागलेल्या आगीत नुकसानग्रस्त व्यापाऱ्यांना तातडीने मदत देण्याचाही मुद्दा त्यांनी उपस्थित केला. एकीकडे शेतकरी आणि दुसरीकडे व्यापारी—दोघांनाही फटका बसत असताना शासनाने तात्काळ ठोस निर्णय घ्यावा, अन्यथा जनतेचा रोष वाढण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.