बुलडाण्यातही आघाडीत बिघाडी! मित्रपक्ष एकमेकांविरुद्ध लढणे अटळ? भाजप संधीचे सोने करणार??

 
बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः राज्यात सत्तेसाठी आघाडी पण ग्राउंड लेव्हलवर तिन्ही पक्षांत विळ्या भोपळ्याचे सख्य! आटपाट बुलडाणानगरी अन्‌ विधानसभा मतदारसंघदेखील या राजकीय वास्तवाला अपवाद नाहीये! यामुळे काही महिन्यांवर आलेल्या बुलडाणा नगरपरिषदेच्या निवडणुकीत देखील आघाडीमधील बिघाडी कायम राहण्याची अन्‌ तिन्ही मित्र पक्ष एकमेकांविरुद्ध लढण्याची चिन्हे आहेत. याचा राजकीय लाभ भाजप उचलणार काय हा प्रश्न ऐरणीवर आलाय!

नुकतेच पार पडलेल्या मोताळा नगरपंचायतीच्या निवडणुकीत आघाडीमधील बिघाडी चव्हाट्यावर आली. राष्ट्रवादी शेवटच्या घटकेपर्यंत प्रतीक्षा करत राहिल्यावरही शिवसेना व काँग्रेसने स्वबळाचा निर्णय घेत सर्व जागा लढविल्या. तिन्ही पक्ष एकमेकांविरुद्ध लढले. एकत्र लढले असते तर आघाडीची सत्ता अटळ होती. याला कारण तेच ते विळ्या भोपळ्याचे सख्य! बुलडाणा शहरच काय बुलडाणा विधानसभा मतदारसंघात ही बिघाडी आहे.

काँग्रेस, शिवसेना अन्‌ राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांत अन्‌ नेत्यांत अजिबात समन्वय नाही, ताळमेळ नाही. पुढील विधानसभा निवडणूक लक्षात घेऊन राजकारण करणारे नेते यामुळेच पालिकेत आघाडीला अनुकूल नाही. आघाडी तर जाऊ द्या या पक्षांत एकवाक्यतादेखील नाही. काँग्रेसमध्ये नेतेच जास्त अन्‌ कार्यकर्ते कमी अशी स्थिती. नेते उघडपणे गटबाजी करून राजकारण करण्यात धन्यता मानतात. तिकीट वाटपात माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांचा वरचष्मा राहणार हे उघड आहे. राष्ट्रवादी म्हणजे पालकमंत्री सांगतील ती पूर्वदिशा मानणारा पक्ष. मात्र कमकुवत संघटनेचा आरोप दूर करून पक्षाने पालिका निवडणुकीसाठी तयारी चालविली आहे.

आघाडीसह आणि आघाडीशिवाय अशा दोन्ही स्थितीत पक्षाने नियोजनपूर्वक पावले टाकणे सुरू केले आहे. मात्र आघाडीत जास्तीत जास्त जागा मिळाव्या आणि अमूक आकड्यापेक्षा कमी आकडा नाहीच यावर तिन्ही पक्ष ठाम आहेत. यामुळे आघाडी होण्याची शक्यता आतापासूनच धूसर आहे. यातच वंचित बहुजन आघाडी मैदानात राहणार आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर यांनी पालिका संग्रामात उडी घेण्याचा निर्णय घेतला.

कालपरवा काँग्रेसच्या नगरसेविका इशरत परवीन व त्यांचे पती मोहम्मद अझहर यांनी पक्षात घेतलेला प्रवेश पालिकेत स्वाभिमानीच्या एन्ट्रीची शक्यता दर्शविणारा ठरला आहे. राष्ट्रवादी व स्वाभिमानी हे एकत्र लढण्याची दाट शक्यता आहे. शिवसेना व अन्य पक्षांविरुद्ध लढण्यासाठी राष्ट्रवादीला आक्रमक प्रचारकाची असणारी गरज यातून भागेल असे घड्याळ्याचे  गणित आहे. या परिस्थितीत महाविकास आघाडीतील फूट भाजपाच्या पथ्यावर पडण्याची चिन्हे वरकरणी दिसत आहे. त्यादृष्टीने भाजपने जोरदार तयारी सुरू केली आहे.

मात्र यासाठी भाजप नेते योगेंद्र गोडे यांच्यासह पदाधिकाऱ्यांना मेहनत करावी लागणार आहे. बिघाडीचा लाभ घेण्यासाठी सुसज्ज नियोजन करणे क्रमप्राप्त ठरणार आहे. निवडणूक कदाचित मेपर्यंत लांबण्याची चिन्हे आहेत. यामुळे तोपर्यंत राजकीय चित्र बदलेल,पण आघाडी होण्याची शक्यता कमीच. याचा लाभ भाजप घेईल का, घेऊ शकतो का? या प्रश्नाचे उत्तर भाजपलाच द्यावे लागणार...