"एक्झीट" झाला आता उद्या "एक्झॅक्ट" पोल! बुलडाणा लोकसभेची ८४ टेबलावर होणार मतमोजणी; दुपारपर्यंत ठरणार खासदार! जो तो म्हणे गुलाल आपलाच...
Jun 3, 2024, 09:11 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव म्हणून नोंद असलेल्या लोकसभा निवडणुकीचे एक्झीट पोल १ जूनच्या सायंकाळी समोर आले. विविध संस्थांनी, चॅनल्सनी आपापले एक्झीट पोल जाहीर केले, अर्थात ते केवळ अंदाज होते.आता खराखुरा म्हणजेच एक्झॅक्ट उद्या,४ जूनच्या मुहूर्तावर समोर येणार आहे. जो तो उमेदवार गुलाल आपलाच म्हणत असला तरी गुलाल कोण उधळणार हे उद्या दुपारपर्यंत स्पष्ट होईल. बुलडाणा लोकसभा मतदार संघासाठी बुलडाणा शहरातील मलकापूर रस्त्यावरील गणेश नगरातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था परिसरात सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरूवात होणार आहे. एकूण ८४ टेबलावर मतमोजणी पार पडणार असून प्रत्येक टेबलनिहाय ३ कर्मचाऱ्यांसह एकूण १६०० कर्मचारी सहभाग घेणार आहेत. त्यामुळे दुपारी १ वाजेपर्यंत निकाल हाती येण्याची शक्यता आहे.
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या निवडणुकीचा कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने १६ मार्च २०२४ रोजी घोषित केला. त्यानुसार बुलडाणा लोकसभा मतदार संघासाठी दुसऱ्या टप्यामध्ये २६ एप्रिल २०२४ रोजी मतदान घेण्यात आले. या निवडणुकीची मतमोजणी मंगळवार, ४ जून २०२४ रोजी सकाळी ८ वाजता करण्यात येणार आहे. या पृष्ठभूमिवर निवडणूक आयोगाची यंत्रणा सज्ज झाली असून मतमोजणी तयारी पूर्ण झाली आहे.
यावेळी ईटीपीबीएस मतमोजणीसाठी १८ व पोस्टल मतमोजणीसाठी १४ टेबल राहणार आहेत. त्यानंतर ईव्हीएम मशीनव्दारे विधानसभानिहाय १४ प्रमाणे एकूण ८४ टेबल मतमोजणी करण्यात येणार आहे. यावेळी प्रत्येक टेबलवर ३ कर्मचाऱ्यांसह टेबलवर ईव्हीएम मशीन पोहचविण्यासाठी १ कोतवाल कर्मचारी असे एकूण १६०० कर्मचारी उपस्थित राहणार आहेत.
मतदारांची उत्सुकता शिगेला
लोकसभा मतदार संघासाठी २६ एप्रिल रोजी मतदान झाल्यानंतर मतदरांमध्ये कोणत्या भागात, कोणता उमेदवार चालला, कोणता उमेदवार किती लिडने निवडून येणार, कोणत्या उमेदवाराला कोणत्या भागातून जास्त मतदान मिळणार, याबाबात चर्चेला उधाण आले होते. दरम्यान, एका महिन्याच्या कालावधीत चर्चा कमी-जास्त प्रमाणात सुरूच राहिला, काहींनी उमेदवार निवडणून येणार असल्याचा पैजा लावल्या, काही ठिकाणी सट्टा बाजाराची चर्चा दिसून आली. दरम्यान, शनिवार, रविवारी एक्झिट पोलमुळे पुन्हा चर्चेत उधाण आले आहे. परिणामी, ४ जून रोजी निकाल लागणार असल्यामुळे मतदारांची उत्सुकला शिगेला पोहचली आहे.
२५ फेऱ्याव्दारे मतमोजणी
लोकसभा मतदार संघासाठी १९६२ मतदान केंद्रावर घेण्यात आलेल्या मतदानाची ८४ टेबलावर २५ फेऱ्याव्दारे मतजोजणी होणार आहे. यावेळी बुलडाणा विधानसभा मतदार संघातील ३३१ मतदान केंद्र, चिखली विधानसभेच्या ३१२ मतदान केंद्र, सिंदखेड राजा विधानसभा मतदार संघातील ३३६ मतदान केंद्र, मेहकर विधानसभा मतदार संघातील ३४९ मतदान केंद्र, खामगाव विधानसभा मतदान केंद्रावरील ३१९ मतदार केंद्र, व जळगाव जामोद विधानसभा मतदार संघातील ३१५ मतदान केंद्रावर झालेल्या मतदानासाठी एकूण २५ फेऱ्याव्दारे मतमोजणी होणार आहे.
तिघांमध्ये कोण मारणार बाजी ?
बुलडाणा लोकसभा मतदार संघाच्या रणसंग्रामात एकूण २१ उमेदवार सहभागी झाले होते. त्यापैकी महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव, महाविकास आघाडीचे प्रा. नरेंद्र खेडेकर व अपक्ष रविकांत तुपकर यांच्यात तुल्यबळ लढत झाली. तिघांनीही विजयाचा दावा केला आहे. वेगवेगळ्या एक्झिट पोलमध्ये वेगवेगळे उमेदवार विजयी होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. तर अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर यांनी आपला एक्झिट पोलवर विश्वास नसल्याचे सांगितले. त्यामुळे पुन्हा बुलडाण्याचा खासदार कोण?, कौल कुणाला ?, याची चर्चा सुरू झाली आहे.