EXCLUSIVE कोण म्हणतंय काँग्रेस संपली? बुलडाणा जिल्ह्यात काँग्रेस नंबर दोनवर; ३ नगरपालिकेत नगराध्यक्ष, घाटावर भाजपपेक्षा चांगला परफॉर्मन्स....
Dec 22, 2025, 19:04 IST
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): काँग्रेस आता संपली, काँग्रेसची काही ताकद नाही असे अनेक जण म्हणतात..अर्थात काँग्रेस विरोधकांचे ते कामच..मात्र बुलढाणा जिल्ह्याच्या आकडेवारीचा विचार केला तर तसे चित्र अजिबात नाही.. राज्यात भलेही काँग्रेसला अपेक्षित यश मिळाले नसेल, मात्र बुलडाणा जिल्ह्यात एकदम अपेक्षित नाही पण बऱ्यापैकी यश मिळाले हे सत्य नाकारता येणार नाही. नगरपालिका निकालात बुलडाणा जिल्ह्याने भाजपच्या खालोखाल यश मिळवले आहे. काँग्रेसचे ६० नगरसेवक आणि ३ नगराध्यक्ष निवडून आलेत. याशिवाय चिखली आणि मेहकरात काँग्रेसने दमदार लढत दिली..
काँग्रेसचे हर्षवर्धन सपकाळ बुलढाण्याचे आहेत. बुलढाण्यात त्यांना यश तर दूरच सपाटून मार खावा लागला. आ.गायकवाडांच्या नेतृत्वातील शिवसेनेने तिथे एकतर्फी विजय मिळवला. सपकाळ यांची लायकी नाही,त्यांनी नैतिकता म्हणून प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा असा टोमणा आ.गायकवाड यांनी विजयानंतर प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना मारला. राज्यात काँग्रेस फेल ठरली हे खरे असले तरी बुलडाणा जिल्ह्याचा विचार करता तसे दिसले नाही. महायुती आणि महाविकास आघाडी अशा ६ प्रमुख पक्षांच्या भाऊगर्दीत काँग्रेसला दुसऱ्या क्रमांकाचे यश मिळाले.
घाटावर लोणार आणि घाटाखाली शेगाव आणि मलकापूर अशा तीन ठिकाणी काँग्रेसने नगराध्यक्ष पदी बाजी मारलीय. चिखली आणि मेहकरात तगडी फाईट दिली, तिथे मोठ्या संख्येत नगरसेवकही निवडून आणले. "घाटावर" जिथे भाजपा नंबर ३ वर आहे तिथे ३३ नगरसेवकांसह काँग्रेस शिवसेनेनंतर (४२ नगरसेवक) दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे.
नेत्यांमध्ये सामन्याचा अभाव, एकही सभा नाही..
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे चिखली नगरपालिकेच्या निवडणुकीत व्यस्त होते. जिल्हाध्यक्ष असूनही त्यांचा वावर इतर नगरपालिकेत दिसला नाही. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ संपूर्ण राज्याचा गाडा हाकावा लागतो म्हणत "घराकडे" दुर्लक्ष करत होते. जिल्ह्यात वरिष्ठ काँग्रेस नेत्यांची एकही सभा नाही, नेत्यांमध्ये समन्वय नाही तरीही काँग्रेसने ३ नगराध्यक्ष आणि ६० नगरसेवक निवडून आणले. याचाच अर्थ काँग्रेस जिल्ह्यात अजूनही "जिवंत" आहे..