EXCLUSIVE निवडणुका पुन्हा लांबणीवर; नव्या आदेशाने संभ्रम वाढला....
Jun 24, 2025, 10:35 IST
बुलडाणा (कृष्णा सपकाळ:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): राज्यातील बहुचर्चित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींसंदर्भात पुन्हा एकदा अनिश्चिततेचे सावट निर्माण झाले आहे. मुंबई महानगरपालिका, महापालिका, नगर परिषद, नगर पंचायतींसह अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता दिवाळीनंतरच होणार असल्याचे स्पष्ट संकेत नव्या सुधारित वेळापत्रकातून मिळाले आहेत. नगरविकास विभागाने सोमवारी (२४ जून) जारी केलेल्या आदेशामुळे या निवडणुका पुन्हा लांबणीवर गेल्या आहेत.
याआधी सर्वोच्च न्यायालयाने मे २०२५ मध्ये राज्य सरकारला आगामी चार महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार राज्य सरकारने प्रभाग रचनेचे वेळापत्रकही प्रसिद्ध केले होते. मात्र आता नगरविकास विभागाने हेच वेळापत्रक सुधारून नव्याने जारी केले असून त्यामध्ये प्रभाग रचना आणि संबंधित प्रक्रियांमध्ये मुदतवाढ दिली आहे.
नवीन आदेशानुसार,
मुंबई महापालिकेसाठी ६ ऑक्टोबरपर्यंत,ड वर्ग महापालिकांसाठी१३ ऑक्टोबरपर्यंत,नगर परिषदांसाठी ३० सप्टेंबरपर्यंत प्रभाग रचनेचे अहवाल संबंधित अधिकाऱ्यांना सादर करावे लागतील.
संपूर्ण प्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्यामुळे दिवाळीपूर्वी निवडणुका होण्याची शक्यता आता धूसर झाली आहे. प्रभाग रचना, हरकती व सूचना, सुनावणी आणि अंतिम अधिसूचना यासाठी नगरविकास विभागाने तब्बल सप्टेंबर अखेर आणि ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्या पर्यंतचा कालावधी दिला आहे. परिणामी, निवडणूक कार्यक्रमाची घोषणाही त्या नंतरच होईल.
जिल्हा परिषद पंचायत समितीचे काय?
दुसरीकडे जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची प्रभाग रचना पूर्ण करण्याची अंतिम मुदत १८ ऑगस्ट असल्याने ग्रामीण भागातील निवडणुका आधी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र निवडणूक विभागातील सूत्रांनुसार, महानगरपालिका व नगरपालिका निवडणुका घेणे यंत्रणेसाठी अधिक सुलभ असल्यामुळे त्या आधी घेतल्या जाऊ शकतात असे सांगण्यात येत आहे.
राज्यात गेल्या अडीच वर्षांपासून स्थगित असलेल्या स्थानिक निवडणुकांमुळे लोकशाही प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आता सुधारित आदेशामुळे पुन्हा एकदा प्रतीक्षेत राहावे लागणार आहे. या पार्श्वभूमीवर, निवडणुकांची प्रतिक्षा करणाऱ्या उमेदवारांसह नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून, निवडणुकांची स्पष्ट तारीख कधी जाहीर होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.