Exclucive मोठी बातमी; देशाचे राजकारण बदलणार! २०२९ मध्ये लोकसभेच्या जागा वाढणार; ५४३ वरून ८१६ होणार! महाराष्ट्रातल्या लोकसभेच्या २० ते २५ जागा वाढण्याची शक्यता;
बुलढाणा लोकसभा मतदारसंघात होणार मोठा बदल...
Mar 24, 2026, 12:14 IST
मुंबई(लाइव्ह ग्रुप नेटवर्क): २०२९ च्या लोकसभा निवडणुकीत लोकसभा सदस्यांची संख्या वाढणार आहे. हा आकडा ५४३ वरून ८१६ होणार आहे. महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्यासाठी केंद्र सरकार "नारी शक्ती वंदन अधिनियमाची" अंमलबजावणी करण्यासाठी लोकसभेच्या जागांमध्ये वाढ करण्याची तयारी करत आहे. लोकसभेच्या जागा वाढल्यानंतर मोठ्या राज्यांना अधिक प्रतिनिधित्व मिळणार आहे, त्यामुळे महाराष्ट्रातील सध्याच्या ४८ जागांवरून वाढ होत त्या ६८ ते ७२ होण्याची शक्यता आहे..यामुळे संपूर्ण देशातील राजकारण बदलणार आहे.
भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील सर्वात मोठा बदल २०२९ च्या निवडणुकांमध्ये पहायला मिळेल. महिलांना ३३ टक्के आरक्षण देतांना सध्याच्या पुरुष खासदारांवर गदा येऊ नये हा या बदलामागचा हेतू आहे. जागा वाढवल्यामुळे जुन्या जागा कायम राहत वाढवलेल्या अधिकच्या जागा महिलांना देऊन कोटा पूर्ण करण्यात येईल. या बदलामुळे लोकसभेच्या बहुमताचा आकडा २७२ वरून ४०९ होणार असल्याचे आता खरोखर बहुमतासाठी "अबकी बार चारसौ पार" नारा द्यावा लागणार आहे.
मूळ कायद्यानुसार आरक्षणाची अंमलबजावणी नवीन जनगणनेनंतर होणाऱ्या मतदारसंघ पुनर्रचनेनंतर होणार होती. मात्र नवीन जनगणनेला उशीर होत असल्याने सरकार २०११ च्या आधारेच पुनर्रचना करून २०२९ पर्यंत आरक्षण लागू करण्याचा विचार करत आहे. लोकसभेच्या एकूण जागा वाढल्यामुळे त्याचा परिणाम एससी एसटी आरक्षणाच्या जागा वाढण्यात येईल. एससी जागा ८४ वरून १२६ तर एसटी जागा सध्याच्या ४७ वरून ७० पर्यंत वाढू शकतात...
बुलढाण्यात हा बदल?
लोकसभेच्या जागा वाढल्याचा परिणाम अनेक लोकसभा मतदारसंघांच्या गणितात होणार आहे. मतदार संघाची पुनर्रचना करताना भौगोलिक आधार हा निकष सुद्धा लावण्यात येणार असल्याने बुलडाणा लोकसभा मतदारसंघात मोठा बदल होऊ शकतो. घाटावरील चार विधानसभा मतदारसंघांचा बुलडाणा लोकसभा मतदारसंघ तर घाटाखालील तीन मतदारसंघात अकोला लोकसभा मतदारसंघातील बाळापूर किंवा अकोट मतदार संघाचा समावेश होऊन नवीन लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात येण्याची शक्यता आहे.