EXCLUSIVE! वाचा, अख्या जिल्ह्याचा निकाल!बुलढाण्यात पूजाताई गायकवाड! चिखलीत पंडितराव देशमुख विजयी! खामगाव भाजपचाच गड; मेहकर–लोणार मध्ये प्रतापराव जाधवांना धक्का;

देऊळगाव राजात मनोज कायंदे "दोघांना" पुरून उरले; सिंदखेडराजात डॉ.शिंगणेंना दिलासा; घाटाखाली काय? वाचा...
 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलढाणा जिल्ह्यातल्या ११ नगरपालिकांसाठी आज मतमोजणी झाली. आतापर्यंत हाती आलेले निकाल संमिश्र स्वरूपाचे आहेत. अनेक ठिकाणचे निकाल नेत्यांना धडा शिकवणारे ठरले आहेत. बुलढाणा आणि चिखली नगरपालिकेकडे जिल्ह्याचे लक्ष लागून होते. बुलढाण्यात शिवसेनेच्या पूजाताई गायकवाड १८ हजार ५२५ मते घेऊन विजयी झाल्यात, दुसऱ्या क्रमांकावर महाविकास आघाडीच्या लक्ष्मी काकस तर भाजपचे जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांच्या पत्नी अर्पिता शिंदे तिसऱ्या क्रमांकावर राहिल्या. चिखली नगरपालिकेची निवडणूक अत्यंत चुरशीशी झाली. सुरुवातीपासूनच भाजपचे उमेदवार पंडितराव देशमुख यांनी घेतलेली आघाडी टिकवून ठेवली, शेवटी त्यांच्याच विजयावर शिक्कामोर्तब झाले. 
देऊळगावराजात आ. मनोज कायदे यांच्या विरोधात माजी मंत्री डॉ. शिंगणे, माजी आ. शशिकांत खेडेकर एकत्र आले होते. मात्र मनोज कायंदे आणि भाजपच्या युतीने दोन्ही माजी आमदारांच्या उमेदवाराला पाणी पाजले. तिथे माधुरीताई तुषार शिपणे यांचा नगराध्यक्ष पदासाठी विजय झाला. सिंदखेडराजात मात्र भाजप आणि राष्ट्रवादीच्या युतीला यश मिळाले नाही. तिथे डॉ. राजेंद्र शिंगणे यांचे कट्टर समर्थक शरद पवारांचे राष्ट्रवादीचे सौरभ तायडे यांचा नगराध्यक्ष पदासाठी विजय झाला. 
केंद्रीय मंत्र्यांना धक्का..
केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांचे होमग्राउंड असलेल्या मेहकरात त्यांना मोठा धक्का बसला. मेहकर येथे भाजप आणि शिवसेना वेगवेगळे लढले. महाविकास आघाडी सुद्धा फुटली.अखेर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे किशोर गारोळे यांची नगराध्यक्षपदी वर्णी लागली. खामगाव नगरपरिषदेत राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्या वहिनी अपर्णा फुंडकर यांनी एकतर्फी विजय मिळवला. काँग्रेसच्या उमेदवार सौ.स्मिता भोसले दुसऱ्या क्रमांकावर राहिल्या. मलकापुरात भाजपचे आमदार चैनसुख संचेती यांना सुद्धा मोठा धक्का बसला. तिथे काँग्रेसचे उमेदवार अतिक जवारीवाले नगराध्यक्ष म्हणून निवडून आले. शेगावात काँग्रेस उमेदवार प्रकाश शेगोकार मतमोजणीच्या शेवटच्या टप्प्यात १८०० मतांनी आघाडीवर आहेत.
लोणार मध्ये काँग्रेसच्या मीरा भूषण मापारी नगराध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत, नगरपालिकेत सर्वाधिक नगरसेवक देखील काँग्रेसचेच निवडून आले आहेत. जळगाव जामोद मध्ये भाजपचे गणेश दांडगे नगराध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत. नांदुऱ्यात भाजपच्या मंगलाताई सुधीर मुरेकर नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्या आहेत... निकालाच्या सविस्तर विश्लेषणाची बातमी बुलडाणा लाइव्ह वर वाचायला मिळेल..