EXCLUCIVE "भाग गेला शीण गेला,अवघा झाला आनंद"! आ.संजय रायमुलकरांकडून वारकरी संप्रदायाच्या सेवेसाठी पावणे तीन कोटींच्या वारकरी भवनाचे काम प्रगतीपथावर! आ. रायमुलकरांना संतांचेही आशीर्वाद....

 
 मेहकर(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): "ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस"! अशा वारकरी परंपरेचा आता मोठा विस्तार झाला आहे. विठ्ठल भक्तीत तल्लीन होणे हाच आत्मिक सुखाचा मार्ग वारकरी संप्रदायाने सांगितला आहे. मेहकर ,लोणार तालुक्यातील वारकरी संप्रदायातील वारकऱ्यांच्या निवासाची चांगली व्यवस्था व्हावी म्हणून मेहकर येथे आमदार संजय रायमुलकर यांच्या प्रयत्नातून पावणेतीन कोटी रुपये खर्चाचे सुंदर वारकरी भवन बांधकाम प्रगतीपथावर आहे.महाराष्ट्राच्या उभारणीत संतांचे आणि त्यांनी सुरू केलेल्या वारकरी संप्रदायाचे खूप मोठे योगदान आहे.आज महाराष्ट्राच्या गावागावात सर्व जाती धर्म पंथात माळकरी, वारकरी अर्थातच सावळ्या विठ्ठलाची भक्ती करणारा हा संप्रदाय मोठ्या प्रमाणात आहे. सरळ साध्या भाषेत कीर्तनातून प्रबोधन करणारे शेकडो कीर्तनकार आज संताचा वारसा पुढे घेऊन जाण्याचे काम करीत आहेत. भगवतभक्तीच्या या कामात आपलेही योगदान असावे म्हणून स्वतः माळकरी आणि वारकरी असलेले मेहकर विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय रायमुलकर यांनीही सेवारुपी योगदान दिले आहे. शेगाव - पंढरपूर या पालखी मार्गावर वसलेल्या मेहकरात आ. रायमुलकर यांनी वारकऱ्यांसाठी सर्व सोवी सुविधायुक्त सुसज्ज असे वारकरी भवनाचे काम हाती घेतले असून ते प्रगतीपथावर आहे.या वारकरी भवनामुळे भागवत धर्माच्या प्रचार प्रसारासाठी गावोगावी फिरणाऱ्या संतांना, कीर्तनकारांना, पायी वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांना आपला शीणभाग हलका करण्यासाठी हक्काचा निवारा मेहकर येथे उपलब्ध होणार आहे..
 
मेहकर शहर आध्यात्मिक दृष्टीनेही अतिशय महत्वाचे आहे. शेगाव पंढरपूर पालखी मार्गावर हे शहर आहे. प्रसिद्ध शारंगधर बालाजी मंदिर मेहकर येथे आहे. भारतातील सहावे नृसिंह मंदिर मेहकरलाच आहे.शिवाय मेहकरच्या परिघातही अनेक धार्मिक स्थळे आहेत.त्यामुळे अनेक वारकऱ्यांचे येथून सातत्याने येणे जाणे असते.शिवाय रात्रीच्या वेळेला अनेक कीर्तनकार कीर्तनाच्या सेवेसाठी ग्रामीण भागात जात असतात. संत आणि कीर्तनकार शक्यतोवर मुक्कामासाठी हॉटेल किंवा लॉजवर थांबणे पसंत करत नाहीत. कारण आत्मिक सुखासाठी आवश्यक असलेले पावित्र्य हॉटेल किंवा लॉजवर मिळत नाही. त्यामुळे बऱ्याच कीर्तनकारांना आपली रात्र बसस्टँडवर काढावी लागते. हीच बाब हेरून आमदार संजय रायमुलकर यांनी नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणून वारकरी भवनासाठी पावणे तीन कोटी रुपये मंजूर करून आणले आहेत. मेहकर येथील ग्रामीण रुग्णालयासमोर हे भव्य दिव्य असे वारकरी भवन उभे राहत असून वारकरी भवनाला जोडणाऱ्या सिमेंट रस्त्यासाठी देखील आ. रायमुलकर यांनी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला आहे. 
 "भाग गेला शीण गेला,अवघा झाला आनंद"!
   आ. संजय रायमुलकर स्वतः वारकरी आणि माळकरी आहेत. वारकऱ्यांच्या अडचणींची त्यांना जान आहे. वारकऱ्यांप्रती त्यांना प्रचंड आस्था आहे. त्यामुळे शीणभाग घालवण्यासाठी, भागवत धर्माच्या प्रचार प्रसारासाठी या वारकरी भवनाचा उपयोग होणार आहे. सर्व संताचे ,वारकऱ्यांचे आशीर्वाद आ. संजय रायमुलकर यांच्यासोबत आहेत. मेहकरात होत असलेल्या वारकरी भवनामुळे"भाग गेला शीण गेला,अवघा झाला आनंद"! अशी समस्त वारकऱ्यांची भावना आहे, अशी प्रतिक्रिया वारकरी महामंडळाचे तालुकाध्यक्ष भागवत महाराज भिसे यांनी दिली आहे. संजय रायमुलकर यांना वारकरी संप्रदाय आणि भाविकांप्रती मोठा स्नेह असल्याने त्यांनी मेहकर लोणार तालुक्यातील अनेक गावांमधील विविध जाती संप्रदायांच्या मंदिरांसमोर ९० कोटी रुपये खर्चाचे जवळपास ६०० सभामंडप बांधकाम मंजूर करून घेऊन ते पूर्णत्वाला नेले आहे. सभामंडपांचा हा एक विक्रम आहे,अशीही माहिती भागवत महाराज भिसे यांनी दिली.