विकसित राष्ट्र बनविण्यासाठी सर्वांचा सहभाग महत्त्वाचा! बुलडाण्यात विकसित भारत संकल्प यात्रेत केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांचे प्रतिपादन!

कार्यक्रम तसा चांगला पण.....पंतप्रधानांच्या भाषणावेळी माजी आमदार संचेती झोपा काढत होते.. 
 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): समाजातील वंचित घटकांना केंद्र शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा, यासाठी 'विकसित भारत संकल्प यात्रा सुरु आहे. या विविध योजनांचा लाभ देत देशाला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्याचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा संकल्प असून, यामध्ये सर्वांचा सहभाग महत्त्वाचा असल्याचे प्रतिपादन केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी आज गांधी भवन येथे आयोजित कार्यक्रमात केले.   
यावेळी आमदार संजय गायकवाड, आमदार श्वेताताई महाले, जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, माजी आमदार चैनसुख संचेती, विजयराज शिंदे व्यासपीठावर उपस्थित होते.
 देशाने नुकताच भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला असून, आता अमृतकाल सुरु आहे. या कालावधीमध्ये जग भारताकडे मार्गदर्शक, इतरांचा सन्मान करणारा, मदत करणारा देश म्हणून पाहते आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशाला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र करण्याचा संकल्प केला असून, त्यामध्ये आपल्या सर्वांचे योगदान महत्त्वपूर्ण राहणार असल्याचे डॉ. कराड म्हणाले.
 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेश, पंजाब, मिझोरम येथील नागरिकांशी संवाद साधला असून, त्यांनी केंद्र शासनाच्या विविध योजनांपासून वंचित असणाऱ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहे. त्यासाठी या रथयात्रेसोबतच विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी जागेवरच नाव नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्याकडेही डॉ. भागवत कराड यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले. 
केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांची डॉ. कराड यांनी यावेळी उपस्थितांना माहिती दिली. कार्यक्रमाला उपस्थित दिव्यांग बांधवाचा उल्लेख करून त्यांच्यासाठी असलेल्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहनही त्यांनी केले. तसेच अमृतकाळात गरीब, महिला, युवावर्ग आणि शेतकऱ्यांचा विकास करण्यावर भर देणार असल्याचे केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. कराड यांनी सांगितले. आगामी काळात केंद्र शासनाच्या लोकल्याणकारी योजना सामान्य नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी प्रधानमंत्री सुरक्षा योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना, किसान क्रेडिट कार्ड, मुद्रा योजना, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, रेशन कार्ड, जमीन आरोग्य पत्रिका वितरण, सेंद्रीय शेती, संजय गांधी निराधार अनुदान योजना, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन आदि विविध योजनेच्या माध्यमातून नागरिकांना लाभ देण्यात येत असल्याचे केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. कराड यांनी सांगितले. आमदार संजय गायकवाड, आमदार श्रीमती श्वेताताई महाले यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.  
केंद्र व राज्य शासनाच्या विविध विभागांमार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती देणारे स्टॉलस येथे उभारण्यात आले होते. या स्टॉलला भेटी देत डॉ. कराड यांनी लाभार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या हस्ते लाभार्थ्यांना लाभाचे वितरण करण्यात आले.
आयुष्यमान भारत, प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना, दीनदयाल अंत्योदय योजना, प्रधानमंत्री आवास योजना, प्रधानमंत्री उज्वला योजना, प्रधानमंत्री विश्वकर्मा, प्रधानमंत्री किसान सन्मान, किसान क्रेडीट कार्ड (केसीसी), प्रधानमंत्री पोषण अभियान, हर घर जल-जल जीवन मिशन, स्वामित्व, जन धन योजना, जीवन ज्योती बीमा योजना, सुरक्षा बीमा योजना, अटल पेन्शन योजना, पीएम प्रणाम आणि नॅनो फर्टीलायझर, प्रधानमंत्री स्वनिधी, प्रधानमंत्री विश्वकर्मा, इ-श्रम कार्ड आदी योजनांची माहिती देण्यात आली.यावेळी लाभार्यां नी मेरी कहानी मेरी जुबानीमध्ये मिळालेल्या लाभाबाबत मनोगत व्यक्त केले.
अन् सीईओ विसपुते बनल्या ऑपरेटर ! 
व्हिडियो काँस्फरिंग द्वारे पंतप्रधान मोदी नागरिकांशी संवाद साधत असतानाच तांत्रिक अडचणीमुळे आवाजाचा त्रास निर्माण झाला.त्यावेळी समोर बसलेल्या सिईओ भाग्यश्री विसपुते उठून ऑडियो ऑपरेट करण्यासाठी लॅपटॉप वर बसल्या.
मोदींचे भाषण सुरू झाले, अन् माजी आमदार संचेतींचे लागले डोळे! 
दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे योजनांची माहिती देत होते. यावेळी मलकापूरचे माजी आमदार तथा भाजपाचे ज्येष्ठ नेते चैनसुख संचेती यांना झोप येत होती. तसे व्हिडिओ, फोटो देखील माध्यमांनी टिपले.
खा.जाधवांची अनुपस्थिती खटकणारी...
दरम्यान आजच्या शासकीय कार्यक्रमाला खा.जाधव अनुपस्थित होते. माध्यम प्रतिनिधिंमध्ये या विषयाची जोरदार चर्चा होती. बुलडाणा लाइव्ह ने माहिती घेतली असता खा.जाधव त्यांच्या पूर्वनियोजित शासकीय कार्यक्रमासाठी आज बँगलोर मध्ये असल्याचे कळले.