खरातांनी दहा जन्म घेतले तरी आ. रायमुलकरांचा विजयरथ रोखणे अशक्य! शिवसेना तालुकाप्रमुख सुरेशतात्या वाळूकरांचा हल्लाबोल; म्हणाले, महाविकास आघाडीच्या उमेदवाराला दिवसा स्वप्न पडतात....

 
 मेहकर(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मेहकर लोणार मतदार संघाचे आमदार संजय रायमुलकर यांना जनतेचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलला आहे. प्रत्येक गावात शेकडो कोटी रुपयांचा निधी देण्यात आलेला आहे. सर्व लोकांना सोबत घेऊन काम करणारे आमदार रायमुलकर असल्यामुळे त्यांचा विजय ही काळ्या दगडावरची रेष आहे. त्यामुळे सिद्धार्थ खरात यांनी दहा जन्म घेतले तरी सुद्धा आमदार रायमुलकर यांचा विजयरथ रोखणे अशक्य आहे असे प्रतिपादन शिवसेना तालुकाप्रमुख सुरेश तात्या वाळूकर यांनी माध्यमांशी बोलताना केले.
महाविकास आघाडीचे उमेदवार सिद्धार्थ खरात यांनी एका प्रचारसभे दरम्यान बोलताना आ. संजय रायमुलकर यांचे डिपॉझिट जप्त होणार असल्याचे विधान केले होते. याबद्दल माध्यमांनी सुरेश तात्या वाळूकर यांना छेडले असता ते म्हणाले की, सिद्धार्थ खरात यांचे हे विधान अत्यंत हास्यास्पद आहे. त्यांना दिवसा स्वप्न पडायला लागली की काय? असा टोमणादेखील सुरेश तात्या वाळूकार यांनी मारला. आमदार संजय रायमुलकर यांचे डिपॉझिट जप्त करणारा अजून जन्माला आला नाही, खरात यांनी एक काय दहा जन्म घेतले तरी देखील आमदार संजय रायमुलकर यांचा विजय रथ त्यांना रोखता येणार नाही असे सुरेशतात्या वाळूकार म्हणाले. डिपॉझिट चा विषय सोडा आमदार संजय रायमुलकर गेल्या तीन वेळेच्या निवडणुकीपेक्षा यंदा सर्वाधिक मताधिक्याने विजयी होतील असेही ते म्हणाले.