एल्गार महामोर्चा अपडेट! उद्या बुलडाण्यात धडकणार शेतकऱ्यांचे वादळ; पार्किंगची अशी आहे व्यवस्था...

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात उद्या,२० नोव्हेंबरला बुलडाण्यात सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार महामोर्चा होणार आहे. या एल्गार महामोर्चाची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. या मोर्चासाठी जिल्ह्यासह सोयाबीन कापूस उत्पादक पट्ट्यातील हजारो शेतकरी बुलडाण्यात धडकणार असल्याने पोलीस यंत्रणेला वाहतूक नियंत्रणासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे.
उद्या मोर्चाला येणाऱ्या शेतकऱ्यांच्या वाहनांच्या पार्किंगचे नियोजन करण्यात आले आहे. मेहकर, लोणार, सिंदखेडराजा, देऊळगावराजा, चिखली, खामगाव या भागातून येणाऱ्या शेतकऱ्यांच्या वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था एडेड हायस्कूलच्या मैदानात करण्यात आली आहे. त्याचबरोबर संग्रामपूर, जळगाव जामोद, नांदुरा, मलकापूर, मोताळा व बुलडाणा तालुक्यातील धाड, देऊळघाट भागातून येणाऱ्या शेतकऱ्यांच्या पार्किंगची व्यवस्था विश्रामभवनातील खुल्या मैदानात करण्यात आली आहे. दुपारी १२ वाजता जिजामाता प्रेक्षागार मैदानातून या मोर्चाला सुरुवात होणार असून जयस्तंभ चौक, बाजार गल्ली, कारंजा चौक मार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. त्यानंतर या मोर्चाचे जाहीर सभेत रूपांतर असून उद्याच्या मोर्चात तुपकर आंदोलनाची पुढील दिशा स्पष्ट करण्याची शक्यता आहे.