ELECTION SPECIAL बुलढाणा जिल्ह्यात ११ नगरपरिषदांसाठी होणार मतदान! महायुतीचे भवितव्य काय? चिखली, बुलढाण्यात महायुती पुढे मोठा पेच....महायुतीत मिठाचा खडा पडणार? 

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या नगरपरिषदांसाठी आता मतदानाचा मुहूर्त जाहीर झाला आहे. २ डिसेंबरला बुलढाणा जिल्ह्यातील ११ नगरपरिषदांसाठी मतदान होणार आहे. १० नोव्हेंबर पासूनच उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात होणार असल्याने आता सर्वच राजकीय पक्षांची धावपळ उडायला सुरुवात झाली आहे. दरम्यान या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी एकत्रित लढणार की वेगवेगळे? याबद्दलचा निर्णय दोन्ही आघाड्यांना लवकरच घ्यावा लागणार आहे. विशेषतः चिखली , बुलडाणा , खामगाव या नगरपरिषदांमध्ये महायुतीचे काय? असा सवाल कार्यकर्त्यांसह सगळ्यांनाच पडला आहे..
महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टी, एकनाथ शिंदेंचे नेतृत्वातील शिवसेना आणि अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी असे तीन प्रमुख पक्ष आहेत. दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे यांची शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा समावेश आहे. जिल्ह्याची राजकीय राजधानी म्हणून ओळख असलेल्या चिखलीत सध्या महायुतीत सर्वकाही आलबेल नाही. विद्यमान आमदार श्वेताताई महाले यांच्या रूपाने भाजपचे नेतृत्व असल्याने भाजपलाच ही जागा सुटावी असा भाजपचा आग्रह आहे. दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेकडून  विलास घोलप यांच्याकडूनही नगराध्यक्ष पदावर दावा ठोकण्यात येत आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे बुलढाण्याचे नगराध्यक्ष भाजपच्या वाट्याला मिळावे यासाठी आग्रही आहेत, मात्र शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार गायकवाड विजयराज शिंदेचे ऐकून घ्यायला तयार नाहीत. चिखली शिवसेनेला द्या तर आम्ही बुलढाणा भाजपला देऊ असा राजकीय डावपेच आमदार गायकवाड यांनी भाजप पुढे टाकला आहे..मात्र आ.गायकवाड यांचा हा प्रस्ताव काही भाजपकडून स्वीकारल्या जाईल अशी अजिबात शक्यता नाही. भाजपचे जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे आणि आ.गायकवाड यांच्यातील शीतयुद्धाचा परिणाम महायुतीवर होण्याची शक्यता आहे. याआधी विधानसभा निवडणुकीत देखील आ.गायकवाड आणि विजयराज शिंदे यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला होता. विजयराज शिंदे यांनी बुलढाणा विधानसभेत अपक्ष अर्ज दाखल केल्यानंतर आ.गायकवाड यांनी कुणाल गायकवाड यांचा अर्ज चिखली विधानसभेतून दाखल केला होता. वरिष्ठ पातळीवर बैठका झाल्यानंतर या वादावर तात्पुरता तोडगा निघाला होता. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी संदर्भात निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिक पातळीवरच असल्याने महायुती बाबत नेमका काय निर्णय होतो? यावर सगळ्यांचे लक्ष लागून आहे.

   दुसरीकडे खामगाव नगरपालिकेत मंत्री आकाश फुंडकर भाजपच्या नगराध्यक्ष पदासाठी दावा ठोकून आहेत. मात्र नुकतेच अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या रूपाने महायुतीत आलेले माजी आमदार सानंदा आणि ना.फुंडकर यांच्यात काही पटत नाही. त्यामुळे इथेदेखील महायुतीत मिठाचा खडा पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. मेहकर आणि लोणार मध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार राहील असे जवळपास स्पष्ट आहे, कारण भाजपकडे सक्षम उमेदवार नसल्याचा दावा शिंदेंच्या शिवसेनेकडून केला जाण्याची शक्यता आहे. सिंदखेडराजा आणि देऊळगाव राजा मध्ये मात्र महायुतीतील शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यांच्यातील वाद टोकाला जाण्याची चिन्हे आहेत. मनोज कायदे यांच्या रूपाने विद्यमान आमदार असल्याने सिंदखेड राजा आणि देऊळगाव राजा या दोन्ही नगरपालिकांवर अजित पवारांची राष्ट्रवादी दावा ठोकत आहे, मात्र विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाचा बदला घेण्यासाठी शशिकांत खेडेकर आणि शिवसेना दंड थोपटून आहेत. घाटाखाली मलकापूर, नांदुरा, शेगाव आणि जळगाव जामोद या जागा भाजपच्याच वाटेला जातील अशी चिन्हे आहेत, मात्र घाटावर महायुती म्हणून एकत्र लढताना मोठी कसरत करावी लागणार आहे...