एकतर मोहीम थांबवा नाहीतर "त्यांना" पोट भरायला वरली मटक्याची दुकाने लावू द्या! माजी आ. हर्षवर्धन सपकाळांचा प्रशासनाला उपरोधिक टोला;
नगरपालिकेने स्वतःचा भ्रष्टाचार कमी करण्याच्या अनुषंगाने कारवाई करणे अपेक्षित असताना नगरपालिका मात्र गरिबांच्या आयुष्याशी खेळत असल्याचे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले. फेरीवाल्यांना सुद्धा त्यांचे अधिकार आहेत, हॉकर्स झोन जाहीर करून तिथे व्यावसायिकांना दुकाने लावण्याचा अधिकार संविधानाने दिला आहे. मोठ्या लोकांची अतिक्रमणे तशीच आहेत मात्र छोट्या व्यावसायिकांना अतिक्रमण धारक ठरवल्या जात असल्याकडे सपकाळ यांनी माध्यमांचे लक्ष वेधले. शहरात अवैध धंदे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत, हे सगळे २ नंबरचे धंदे अतिक्रमीत जागेत चालतात, मात्र त्यांचे अतिक्रमण काढण्याची हिम्मत प्रशासन करेल का ? असा सवालही सपकाळ यांनी उपस्थित केला. सध्या सणांचे दिवस आहेत. व्यावसायिकांनी विकण्यासाठी सामान आणलेले आहे, ते त्यांना विकू द्यावे. सुरू असलेली कारवाई थांबवावी . दोन दिवसांत नगरपालिका प्रशासनाने कारवाई थांबवली नाही तर आम्ही आक्रमक भूमिका घेऊ असे सपकाळ म्हणाले. एकतर कारवाई थांबवा नाहीतर ज्यांची दुकाने काढून टाकली त्यांना उपजीविकेसाठी वरली - मटक्यांची दुकाने लावू द्या असा उपरोधिक टोला देखील हर्षवर्धन सपकाळ यांनी लगावला.