तुपकरांच्या आंदोलनामुळे खा. जाधवही सरसावले!

 
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कापूस-सोयाबीन उत्‍पादकांच्या मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला मोठे यश मिळताना दिसत आहे. सोयाबीन आयातीवर निर्बंध आणण्यासाठी तुपकर आक्रमक झाले असतानाच, खासदार प्रतापराव जाधव यांनीही त्‍यांच्या पावलावर पाऊल ठेवत याविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय कृषी मंत्र्यांना निवेदन दिले.

खा. जाधव यांनी निवेदनात म्‍हटले आहे, की सध्या शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणावर सोयाबीन आहे. ऑल इंडिया पोल्‍ट्री ब्रिडर असोसिएशनच्या मागणीमुळे विदेश व्यापार महासंचालकांनी साडेपाच लाख मेट्रिक टन सोयाबीन ३१ मार्च २०२२ पर्यंत आयात करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. बाजारात सोयाबीन जवळपास सहा हजार रुपये प्रतिक्विंटलने विकली जात होती. मात्र आयातीच्या हालचालींमुळे जवळपास ६०० ते ८०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत दर घसरले आहेत.

आधी संकटात असलेल्या शेतकऱ्यांना यामुळे पुन्‍हा आर्थिक संकटाचा सामना करावा लागणार आहे. केंद्र सरकारने आयातीवर निर्बंध आणून शेतकऱ्यांचे हित साधावे, अशी मागणी खा. जाधव यांनी केली आहे. विशेष म्‍हणजे, तुपकर यांनी हा प्रश्न गेल्या काही दिवसांपासून उचलून धरला असून, याच प्रश्नी लवकरच राज्‍य सरकारच्या शिष्टमंडळासह ते पंतप्रधान, केंद्रीय मंत्र्यांना भेटणार आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही त्‍यांना या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी केंद्रीयमंत्र्यांच्या भेटीला घेऊन जाण्याची तयारी दर्शवली आहे. आता खासदारांनीही तुपकरांच्या मागणीला उचलून धरत निवेदन दिल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे.