डॉ. शशिकांत खेडेकरांसाठी केंद्रीय मंत्री ना.प्रतापराव जाधव मैदानात! देऊळगावराजा, सिंदखेडराजात प्रचारकार्यालयांचे उद्घाटन दणक्यात! ना.जाधव म्हणाले, मतदार संघाचा विकास करण्याची क्षमता डॉ. खेडेकरांतच...

 
 देऊळगावराजा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): २०१४ ते २०१९ या पाच वर्षात सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघासाठी जेवढा निधी डॉ. शशिकांत खेडेकर यांनी मंजूर करून आणला तेवढा आतापर्यंत कधीच आला नव्हता. आमदार नसताना सुद्धा डॉ.शशिकांत खेडेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे थेट पाठपुरावा करून देऊळगाव राजा आणि सिंदखेडराजा शहरांसाठी भरघोस निधी आणला. निधी कसा मंजूर करून आणायचा हे शशिकांत खेडेकर यांना चांगचे माहित आहे. त्यांच्याकडे विकासाची दूरदृष्टी आहे.त्यामुळे सिंदखेडराजा मतदार संघाचा विकास करायचा असेल तर डॉ. शशिकांत खेडेकर यांच्यातच ती क्षमता आहे बाकीच्यांचा अनुभव आपण घेतला आहे.. त्यामुळे शशिकांत खेडेकर यांच्या प्रचारासाठी झपाट्याने कामाला लागा, दिवस रात्र एक करा आणि २३ नोव्हेंबरला विजयाचा गुलाल उधळा असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री ना.प्रतापराव जाधव यांनी केले. सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉ.शशिकांत खेडेकर यांच्या देऊळगाव राजा आणि सिंदखेडराजा शहरातील प्रचार कार्यालयांचे उद्घाटन केंद्रीय मंत्री ना.जाधव यांच्या हस्ते काल,८ नोव्हेंबरच्या सायंकाळी झाले. यावेळी ना.जाधव यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधत प्रचारासाठी आवश्यक त्या सूचना दिल्या..

 पुढे बोलतांना केंद्रीय मंत्री ना.जाधव म्हणाले, २०१९ ला थोड्या मतांनी आपला पराभव झाला होता. त्यामुळे ती उणीव आता भरून काढा. महायुती सरकारने आणलेल्या योजना लोकांपर्यंत पोहोचवा. विकासाच्या मुद्द्यावरच आपल्याला मते मागायची आहेत. आपण केलेल्या कामाच्या भरवशावर आपण लोकांसमोर जात आहोत असे ना .जाधव म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अडीच वर्षात ज्या गतीने निर्णय घेतले तेवढे निर्णय आतापर्यंत कधीच झाले नाहीत. विकास काय असतो हे महायुती सरकारने दाखवून दिली आहे. शेतकरी महिला कामगार कष्टकरी या सर्वांच्या हिताचे महायुती सरकारच आहे. लोक आपल्याला मतदान द्यायला तयारच आहेत..फक्त गाफील न राहता तळा गावातल्या सर्व मतदारांना भेटा.. महाविकास आघाडी वाल्यांची लबाडी ही त्यांच्या ध्यानात आणून द्या. महाविकास आघाडीवाले लबाडासारखे काहीही आश्वासने देत सुटले आहेत असे ना.जाधव म्हणाले. योग्य नियोजनामुळे आपलाच विजय होईल असा विश्वासही ना.जाधव यांनी व्यक्त केला. 
यावेळी बोलताना डॉ.शशिकांत खेडेकर यांनी ना.प्रतापराव जाधव यांचे आभार मानले. ना. जाधव साहेबांच्या मार्गदर्शनातच आपली वाटचाल सुरू आहे. आपण केलेली विकास कामे हेच आपले बळ आहे. आपली स्पर्धा कुणाशीही नाही..आपली स्पर्धा आपल्याशीच आहे असे डॉ.खेडेकर म्हणाले. सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघातील अनेक कामे आपल्याला करायचे आहेत. त्यासाठी सभागृहात जाणे आवश्यक आहे. आमदार नसताना देखील आपण मुख्यमंत्री महोदयांकडे पाठपुरावा करून अनेक कामे मंजूर करून घेतली. मात्र आपण केलेल्या कामांचे फुकटचे श्रेय विरोधकांनी लाटण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही डॉ.खेडेकर यांनी यावेळी केला. यावेळी महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.