डॉ. शिंगणे म्‍हणाले, आमचं "दुकान' मोठंच ; ते बंद पाडणे तुम्हाला अशक्य!‌

 

जळगाव जामोद (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः एरवी शांत, संयमी नेते म्हणून परिचित असलेल्या पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी थेट पंतप्रधान, भाजपाच्या नेत्यांवर आक्रमक हल्ला चढवल्याने काही क्षण व्यासपीठ आणि समोरील पदाधिकारी, कार्यकर्तेही अचंबित झाल्याचे चित्र भेंडवळ (ता. जळगाव जामोद) येथे आज, २६ नोव्‍हेंबरला दिसून आले.

पहा व्हिडिओ : 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यात डॉ. शिंगणे बोलत होते. राजकीय प्रतिस्पर्ध्यांचेच काय स्वपक्षीयांचे देखील अंदाज चुकविणाऱ्या या नेत्याने आजदेखील सर्वांचे अंदाज चुकवत गल्ली ते दिल्ली अशा सर्वांनाच धारेवर धरले!  मागील दोन वर्षांपासून आम्ही पुन्हा येऊ, पुन्हा येऊ असे म्हणणारे देवेंद्र फडणवीस, अध्यक्ष पाटील आता पार थकलेत, आता त्यांनी आशा सोडून दिली, अशी खिल्ली डॉ. शिंगणेंनी उडवली. अलीकडे ईडी- सीबीआय - आयकर विभागाची भीती दाखवून विरोधकांना दाबायचा  प्रयत्न त्यांनी चालविला आहे.

मात्र राज्यातील जनता आघाडी सरकारच्या पाठीशी असल्याने आम्ही त्यांच्या ईडी- बिडी- सिडीला अजिबात मोजत नाही असे त्यांनी ठणकावून सांगितले. राज्यातील आघाडी सरकार उत्तमरित्या काम करीत असल्याने जनता पाठीशी असल्याचे ते म्हणाले. वर्षभरापासून आंदोलन करणाऱ्या शेतकरी व त्यांच्या सत्याग्रहाबद्दल मौन बाळगणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अचानक माईकवर येऊन भाईयो और बहनो म्हणत माफी मागितली. तसेच 3 काळे कायदे मागे घेण्याची घोषणा केली. शेतकऱ्यांच्या अभेद्य एकजुटीला ते घाबरल्याचे सांगून आघाडी सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे डॉ. शिंगणे यावेळी म्हणाले. मित्र पक्षाच्या नेत्याने काही दिवसांपूर्वी केलेल्या विधानाचा नामोल्लेख न करता त्यांनी राष्ट्रवादीचे दुकान मोठे असून त्याला बंद करण्याच्या भानगडीत पडू नका, त्यासाठी तुमच्या 7 पिढ्या जन्माला याव्या लागतील, असा टोला त्यांनी लगावला.

... दुरुस्तच ना होणाऱ्यांना बाहेरचा रस्ता
डॉ. शिंगणेंनी केवळ शूत्रपक्षांनाच नाही तर स्वकीय गद्दारांनाही खडसावले. गटबाजीवर बोलत भलतेच रंग उधळणाऱ्या "रावा'लाही खडसावले.  नेहमीच इतरांवर टीका करायची आपलं काही सांगायचं नाही अशी कार्यपद्धती आता त्यांनी सोडून दिलेली बरी. इतरांना उघडे करायचे अन्‌ आपलं सर्व झाकून ठेवायची असं वागणं बरं नव्हे. गट तट आपणाला मान्य नाही. जर कोणी वारंवार सांगूनही दुरुस्त होत नसतील, त्यांच्यामुळे इतर चांगले कार्यकर्ते नादुरुस्त होत असतील तर अशा विघ्नसंतोषी कार्यकर्त्यांना बाहेरचा रास्ता दाखविणार, असा इशाराही शिंगणे यांनी दिला. एकूणच हा कार्यक्रम त्यांच्या दणकेबाज भाषणांनी गाजला.