आ.संजय गायकवाडांनी केली ना.प्रतापराव जाधव आणि आ. डॉ.संजय कुटेंची तक्रार...! म्हणाले मीच नाही तर आणखी दोघांनी....

 
  
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): विधानसभेचे अधिवेशन आजपासून नागपुरात सुरू झाले आहे. यासाठी सर्वच आमदार नागपुरात पोहोचले आहेत. दरम्यान आज सकाळीच विधानभवन परिसरात माध्यमांशी बोलताना आ. संजय गायकवाड यांनी मोठा गौप्यस्फोट केला. विधानसभा निवडणुकीत पक्षविरोधी कारवाई करणाऱ्यांची तक्रार एकनाथ शिंदे यांच्याकडे केल्याचे संजय गायकवाड एका वृत्तवाहिनीशी बोलतांना म्हणाले.
   विधान भवन परिसरात एका वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीने आ.संजय गायकवाड यांना गाठले. यावेळी मंत्री पदाबाबत बोलताना आ.गायकवाड म्हणाले की, मी मंत्रिपद मागितले नव्हते त्यामुळे नाराजीचा प्रश्न नाही. संजय कुटेंना डावलण्याबाबत संबधित प्रतिनिधीने आ. गायकवाड यांना छेडले असता तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय आहे. त्यांना मंत्रीपद मिळेल असे अपेक्षित होते मात्र मिळाले नाही, त्याऐवजी आकाशदादांना मंत्री पद मिळाले.. मात्र तो त्यांच्या पक्षाचा विषय आहे असे आ.गायकवाड म्हणाले. विधानसभा निवडणुकीत पक्षविरोधी कारवाई करणाऱ्यांची तक्रार एकनाथ शिंदे यांच्याकडे केली असल्याचेही ते म्हणाले. यावर संबंधित प्रतिनिधीने ना. प्रतापराव जाधव, डॉ.संजय कुटे यांची तक्रार केली का असा उलट प्रश्न केला असता ज्यांची ७ -८ लोकांची तक्रार केली त्यात हे दोघेही आहेत असे आ.गायकवाड म्हणाले. मीच नाही तर मेहकर आणि सिंदखेडराजाच्या आमच्या पक्षाच्या पराभूत उमेदवारांनी देखील तक्रार केल्याचा गौप्यस्फोट करून आ. संजय गायकवाड यांनी खळबळ उडवून दिली आहे.