डॉ.ऋतुजा चव्हाण आज भरणार उमेदवारी अर्ज! रविकांत तुपकरांची वादळी तोफ आज मेहकरात धडाडणार; तुपकरांच्या पाठिंब्यामुळे लढत रंगतदार होणार...
Oct 28, 2024, 06:46 IST
मेहकर(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मेहकर विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत उमेदवार डॉ.ऋतुजा चव्हाण आज, २८ ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. विशेष म्हणजे शेतकरी नेते शेतकरी क्रांतिकारी संघटनेचे संस्थापक रविकांत तुपकर आज मेहकरात येणार असून डॉ. ऋतुजा चव्हाण यांच्यासाठी ते जाहीर सभेला संबोधित करणार आहेत.त्यामुळे आजची सभा वादळी ठरण्याची चिन्हे आहेत..
रविकांत तुपकर यांनी लोकसभा निवडणुकीत मेहकर विधानसभा मतदारसंघात जवळपास बरोबरीची मते घेतली होती. तुपकर यांना मानणारा मोठा वर्ग मेहकर विधानसभा मतदारसंघात आहे. डॉ.ऋतुजा चव्हाण आणि ऋषांक चव्हाण हे दांपत्य सातत्याने शेतकरी चळवळीशी संबंधित राहिले आहे. डॉ. ज्ञानेश्वर टाले यांच्यासोबत ऋषांक चव्हाण यांनीही मेहकर विधानसभा मतदारसंघात शेतकरी प्रश्नांवर वेगवेगळी आंदोलने केली आहेत. शेतकऱ्यांच्या चळवळीची संघटनात्मक बांधणी देखील केली आहे. दोन दिवसांआधी बुलडाणा येथे झालेल्या कार्यकर्ता मिळाव्यात, रविकांत तुपकर यांनी महाविकास आघाडी सोबत जाणार नसल्याचे जाहीर करत शेतकरी चळवळीत काम करणाऱ्या प्रमाणिक उमेदवारांच्या पाठीशी उभे राहणार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे आज ,तुपकर मेहकर येथे डॉ. ऋतुजा चव्हाण यांच्या अर्ज भरण्याच्या प्रसंगी उपस्थित राहणार आहेत, यावेळी होणाऱ्या जाहीर सभेला देखील रविकांत तुपकर संबोधित करणार आहेत. वंचित बहुजन आघाडी आणि शेतकरी चळवळ पाठीशी असल्याने डॉ.ऋतुजा चव्हाण यांनी ताकद आता दहापटीने वाढली आहे. आमदार रायमुलकर यांच्याशी डॉ.ऋतुजा चव्हाण यांची लढत होणार असून महाविकास आघाडीचे उमेदवार खरात आऊट ऑफ रेस होतात की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे...