डॉ. ऋतुजा चव्हाण २८ ऑक्टोबरला भरणार उमेदवारी अर्ज! पत्रकार परिषदेत म्हणाल्या, लढाई जनशक्ती विरुद्ध धनशक्ती..विजय जनशक्तीचाच होणार!

 
  
डोणगांव(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मेहकर-लोणार मतदारसंघात मुलभूत सुविधांचा अभाव आहे. येथील जनतेचा विकास झालेला नाही. महिलांचे प्रश्न सुटलेले नाहीत. शैक्षणिक सुविधा उपलब्ध नाहीत. आरोग्याच्या समस्या सुटलेल्या नाहीत. या मतदारसंघातील रस्ते, वीज, पाणी, विविध समस्या जैसे थे आहेत. एखाद्या गावात सभामंडपसाठी निधी दिला म्हणजे विकास झाला नाही. गावागावात स्मशानभूमी नाहीत. त्यामुळे येथील कोणतीच विकासाची कामे झालेली नसल्याने हे सत्ताधाऱ्यांचे अपयश आहे. आता सत्ताधाऱ्यांनी विकासाच्या गप्पा करु नये, आता धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी लढाई आहे. असा घणाघात वंचित बहुजन आघाडीच्या महिला उमेदवार डॉ ऋतुजा चव्हाण यांनी मेहकर येथे पत्रकार परिषदेत केला आहे. २८ ऑक्टोबरला वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार म्हणून अर्ज भरणार असल्याचेही त्यांनी यावेळी जाहीर केले. मेहकर येथे वंचित बहुजन आघाडीकडून पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत महिला उमेदवार डॉ. ऋतुजा चव्हाण पत्रकार परिषदेत बोलत होत्या. यावेळी पत्रकार परिषदेमध्ये ऋषांक चव्हाण यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे जेष्ठनेते भाई महेंद्र पनाड, तालुकाध्यक्ष मोबीन भाई, लोणार तालुकाध्यक्ष दिलीप राठोड, युवा तालुकाध्यक्ष आबाराव वाघ, जेष्ठ नेते वसंतराव वानखेडे, अड बबनराव वानखेडे, मिलिंद खंडारे, पवन अवसरमोल, गौतम गवई, यांच्यासह लोणार - मेहकर मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
 पुढे बोलतांना डॉ. ऋतुजा चव्हाण यांनी सर्वप्रथम बाळासाहेब आंबेडकर यांचे आभार मानले.आज खऱ्याअर्थाने मेहकर मतदारसंघातील महिलांना ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी न्याय दिल्याचे त्या म्हणाल्या. एक सर्वसामान्य महिलेला त्यांनी उमेदवारी दिली. त्यामुळे मतदारसंघातील जनता आपल्या पाठीशी उभी राहील असा विश्वास असल्याचे त्या म्हणाल्या. ही लढाई धनशक्ती विरोधात जनशक्तीची आहे. त्यामुळे या लढतीत नक्कीच जनशक्तीचा विजय होणार आहे असा आत्मविश्वास देखील त्यांनी बोलून दाखविला.
मतभेद विसरून कामाला लागू...
यावेळी ऋषांक चव्हाण म्हणाले की, आपसातील मतभेद विसरून आता आपण कामाला लागू. विजय निश्चित आपलाच होणार आहे. डॉ. ऋतुजा चव्हाण एक महिला उमेदवार आहेत. त्या कोणत्याही उमेदवारांच्या मतांचे विभाजन करण्यासाठी उभ्या नाहीत तर त्या निवडून येण्यासाठी आणि श्रेद्धीय अड बाळासाहेब आंबेडकर यांचे हात बळकट करण्यासाठी आणि येथील जनतेचा विकास करण्यासाठी उभ्या आहेत असे ऋषांक चव्हाण यावेळी म्हणाले.
दिल्लीत सरकारी शाळांची गुणवत्ता पहा..मग हे आपल्या इथे का होऊ शकत नाही? असा सवाल करीत विधानसभा निवडणुकीत मायबाप जनतेने संधी दिल्यास प्राधान्याने शिक्षणाचे प्रश्न सोडवणार असल्याचे ऋषांक चव्हाण म्हणाले.