डॉ.ऋतुजा चव्हाण म्हणतात..३० वर्षांत मेहकर मतदारसंघ ५० वर्षे मागे गेला! आता विकासाचा बॅकलॉग भरून काढणार! 

 
  
मेहकर(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): ३० वर्षात मेहकर मतदारसंघाला ५० वर्षे मागे नेण्याचे काम प्रस्थापित राजकारण्यांनी केले. खा.जाधव आणि आ. रायमुलकर यांनी एकहाती सत्ता असताना देखील विकास केला नाही. लोणार जागतिक कीर्तीचे पर्यटन केंद्र असताना तिथे केवळ विकास आराखड्यांची घोषणा करण्यात आली, वास्तवात मात्र विकास नावालाच आहे.सर्वच क्षेत्रात मेहकर मतदारसंघात विकासाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी मी शर्थीचे प्रयत्न करीन अशी ग्वाही मेहकर विधानसभा मतदारसंघाच्या वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत उमेदवार डॉ.ऋतुजा चव्हाण यांनी दिली आहे. निवडक माध्यमांशी बोलतांना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली..
पुढे त्या म्हणाल्या की, शिक्षण, आरोग्य, सिंचन, उद्योग या सर्वच क्षेत्रात मेहकर विधानसभा मतदारसंघ मागासलेला आहे. मोठ्या आरोग्याच्या सोईसाठी जिल्ह्याच्या बाहेर जावे लागते. सिंचनाची पुरेशी सोय नसल्याने शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पन्न होत नाही. शेतकऱ्यांना विजेची समस्या आहे. मागास अशी ओळख असल्याने उद्योगधंदे मेहकर लोणार येथे येत नाहीत. त्यामुळे या सर्वच क्षेत्रातील अनुशेष भरून काढण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्या म्हणाले.जनतेने त्यांना ३० वर्षे संधी दिली, मला फक्त ५ वर्षे द्या..पुढच्या निवडणुकीत मी कामांच्या भरवशावर तुमच्यासमोर येईल असेही डॉ. ऋतुजा चव्हाण म्हणाल्या...