“मी घेतलेला निर्णय तुम्हाला मान्य असेल का?” राहुल बोंद्रेचा समर्थकांना थेट सवाल! काँग्रेसला धक्का देत भाजपमध्ये जाणार? पुढच्या २-३ दिवसांत मोठा राजकीय ‘गेम’ होण्याची शक्यता!
“मी घेतलेला निर्णय तुम्हाला मान्य असेल का?” असा थेट सवाल राहुलभाऊंकडून त्यांच्या निकटवर्तीय आणि समर्थकांना विचारला जात असल्याची माहिती आहे. त्यामुळे बोंद्रे यांच्या मनात नेमका कोणता निर्णय शिजतोय, याबाबत राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. समर्थकांकडूनही या संभाव्य निर्णयावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत असल्याचे समोर येत आहे.
काँग्रेस सोडून भाजपची वाट? ‘त्या’ बड्या नेत्याची मध्यस्थी चर्चेत!
राहुल बोंद्रे यांच्या भाजप प्रवेशामागे राज्य मंत्रिमंडळातील एका बड्या नेत्याची मध्यस्थी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. विशेष म्हणजे, हे नेते पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे असल्याचीही चर्चा आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, या राजकीय घडामोडींना अंतिम स्वरूप देण्याच्या हालचाली सुरू असून पुढील दोन-तीन दिवसांत बोंद्रे यांच्या भाजप प्रवेशाबाबत चित्र स्पष्ट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.मात्र, बोंद्रे यांच्याकडून अद्याप अधिकृतपणे भाजप प्रवेशाची घोषणा झालेली नाही. त्यामुळे या चर्चांना अधिकृत दुजोरा मिळालेला नसला, तरी त्यांच्या समर्थकांच्या भेटीगाठींमुळे राजकीय चर्चांना चांगलेच उधाण आले आहे.
दहा वर्षे चिखलीवर काँग्रेसचा झेंडा; मोदी लाटेतही मिळवला विजय!
राहुल बोंद्रे यांनी २००९ ते २०१९ अशी सलग दहा वर्षे चिखली विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून प्रतिनिधित्व केले. २००९ ते २०१४ या काळात राज्यात काँग्रेस आघाडीचे सरकार होते. त्यानंतर २०१४ मध्ये देशभरात आणि राज्यात मोदी लाटेची जोरदार चर्चा असतानाही बोंद्रे यांनी चिखली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचा गड कायम राखत विजय मिळवला होता.
मात्र, त्यानंतरच्या राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल झाला.
२०१९ आणि २०२४ मध्ये सलग पराभव; आता सत्तेच्या वर्तुळात प्रवेशाची चर्चा! २०१९ आणि २०२४ या दोन्ही विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपच्या आमदार श्वेताताई महाले पाटील यांनी राहुल बोंद्रे यांचा पराभव केला. विशेष म्हणजे, काही महिन्यांपूर्वीपर्यंत बोंद्रे हे काँग्रेसचे बुलडाणा जिल्हाध्यक्ष म्हणून पक्षाची धुरा सांभाळत होते. मात्र, आता राजकीय परिस्थिती बदलली असून सत्तेच्या समीकरणात भाजपची वाट धरण्याची शक्यता त्यांच्या नावाभोवती चर्चिली जात आहे.
२०१९ मध्येही उठली होती पक्षप्रवेशाची चर्चा; पण तेव्हा ‘गेम’ फिस्कटला!
राहुल बोंद्रे यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा आज पहिल्यांदाच होत नाही. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरही त्यांच्या पक्षप्रवेशाच्या चर्चांनी राजकीय वातावरण तापले होते. मात्र, त्यावेळी हा प्रवेश प्रत्यक्षात होऊ शकला नव्हता.आता मात्र परिस्थिती वेगळी असल्याचे बोलले जात आहे. समर्थकांच्या भेटीगाठी, निर्णयाबाबत त्यांच्याकडून घेतली जाणारी मते आणि पडद्यामागील राजकीय हालचाली पाहता यावेळी बोंद्रे यांच्या भाजप प्रवेशाची शक्यता अधिक प्रबळ असल्याचे मानले जात आहे.
समर्थक काय म्हणतात? निर्णय नेमका काय?
“मी घेतलेला निर्णय तुम्हाला मान्य असेल का?” या राहुल बोंद्रे यांच्या कथित सवालामुळे सर्वाधिक उत्सुकता निर्माण झाली आहे. समर्थकांच्या प्रतिक्रियाही एकसारख्या नसल्याने बोंद्रे यांच्यासमोरही राजकीय निर्णय घेताना काही आव्हाने असल्याचे दिसून येते. त्यामुळे आता सर्वांचे लक्ष राहुल बोंद्रे यांच्या पुढील भूमिकेकडे लागले आहे.
काँग्रेसचा हात सोडून भाजपची कमळाची साथ स्वीकारणार का?
की समर्थकांच्या भूमिकेनंतर निर्णय बदलणार?
पुढील दोन-तीन दिवसांत या राजकीय चर्चांना पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे. अर्थात, राजकारणात काहीही कायमचे नसते आणि शेवटच्या क्षणापर्यंत समीकरणे बदलू शकतात! त्यामुळे राहुल बोंद्रे यांच्या राजकीय निर्णयाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.