जिल्ह्यात काँग्रेस संघटन मजबूत करण्यासाठी जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रेंचा नवा प्लॅन तयार! विधान परिषद आमदार धिरज लिंगाडेंवर सोपवले कठीण काम...
Jul 26, 2024, 11:08 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): विधानसभा निवडणुका अवघ्या दोन-तीन महिन्यांवर आल्या आहेत. लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या दमदार यशामुळे काँग्रेसमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यात काँग्रेस पक्षसंघटन मजबूत करून विधानसभा निवडणुकीतही घवघवीत यश मिळवण्याचा इरादा काँग्रेस जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रेंचा आहे. त्यासाठी एक विशेष प्लॅन जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी तयार केला आहे. जिल्ह्यातील ७ विधानसभा मतदारसंघासाठी समन्वयक आणि सह-समन्वयक म्हणून बड्या पदाधिकाऱ्यांकडे जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
मेहकर आणि सिंदखेडराजा विधानसभेसाठी विधानपरिषद आमदार धिरज लिंगाडे यांना समन्वयक म्हणून नेमण्यात आले आहे. त्यांना मेहकर विधानसभा सहसमन्वयक म्हणून सुधाकर धमक आणि सिंदखेडराजा विधानसभेत सचिन शिंगणे साथ देणार आहेत. मेहकर आणि सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे पक्षसंघटन पाहिजे तेवढे मजबूत नाही त्यामुळे आ. लिंगाडे यांच्यावर आव्हानात्मक आणि कठीण जबाबदारी आहे.
ज्या विधानसभा मतदारसंघातून स्वतः जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे निवडणूक लढवत असतात त्या चिखली मतदारसंघासाठी वकील ॲड.गणेशराव पाटील, सह समन्वयक म्हणून शैलश सावजी यांच्यावर जबाबदारी देण्यात आली. बुलडाणा विधानसभेसाठी समन्वयक म्हणून डॉ.अरविंद कोलते, सह समन्वयक म्हणून सौ .वर्षाताई वनारे, मलकापूर विधानसभेसाठी प्रकाश देशमुख व अंबादासजी बाठे, जळगाव जामोद विधानसभेसाठी समन्वयक म्हणून श्याम उमाळकर तर सह समन्वयक म्हणून दिलीपराव वाघ आणि खामगाव विधानसभेसाठी समन्वयक म्हणून हाजी रशीदखाँ जमादार व सह समन्वयक म्हणून ॲड. हरीश रावळ यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी या नेत्यांना समन्वय साधण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.