विकृती..! शेतकऱ्याची प्रगती डोळ्यात खुपली; भामट्याने शेतातील उभी तूर कापली; किनगाव जट्टू येथील घटना...
Dec 21, 2024, 18:32 IST
बिबी(श्रीकृष्ण पंधे:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): विकृती...होय..विकृत माणसे काय करतील याचा नेम नाही..अशी जळक्या प्रवृत्तीची विकृत माणसे समाजात वावरतांना पदोपदी दिसतात..या जळक्यांना स्वतःला काही करता येत नाही मात्र दुसऱ्या कुणाची प्रगती देखील या जळक्यांना सहन होत नाही, दुसऱ्यांची प्रगती जळक्यांच्या डोळ्यात खुपते..बिबी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या किनगाव जट्टू शिवारात असाच एक कारनामा समोर आला आहे..एका विकृत भामट्याने शेतकऱ्याच्या शेतातील बहरलेली तूर कापून नेली..या प्रकरणी शेतकऱ्याने पोलिसांत ठाण्यात तक्रार दिली आहे..
प्राप्त माहितीनुसार किनगाव गट्टू येथील शेतकरी काशिनाथ राऊत यांची वसंत नगर शिवारात गट नंबर ३९ मध्ये ४ एकर १२ गुंठे शेती आहे. एक हेक्टर शेतीत सोयाबीन पेरलेले होते व आंतरपीक म्हणून तुरीचे पीक घेतलेले होते. सोयाबीन सोंगणी केल्यानंतर तुरीच्या पिकाला खत पाणी दिल्यामुळे तूर चांगलीच बहरली होती..हीच बहरलेली तूर कुण्यातरी अज्ञात भामट्याच्या डोळ्यात खुपली. त्यामुळे त्या भामट्याने १९ डिसेंबरच्या रात्री बहरलेली उभी तूर कापून नेली. यामुळे शेतकऱ्याची जवळपास आठ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी शेतकरी काशिनाथ राऊत यांनी बीबी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे...