धर्मवीर दिलीपराव रहाटेंना अपेक्षित असलेला मतदारसंघ घडवणार! डॉ.ऋतुजा चव्हाण यांचे प्रतिपादन! शेंदला येथे प्रचाराला उस्फुर्त प्रतिसाद...

 
 मेहकर: धर्मवीर दिलीप रहाटे यांनी सर्व समाजाला सोबत घेऊन समाजकारण केले. खऱ्या अर्थाने लोकनेता म्हणजे काय असते हे दिलीप रहाटे यांनी दाखवून दिले.. १८ पगड जातीच्या लोकांना सोबत घेऊन समाजकारणाचा उच्च आदर्श धर्मवीर दिलीप रहाटे यांनी घालून दिला. मेहकर लोणार विधानसभा मतदारसंघाचा चौफेर विकास व्हावा, शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी यावी हे धर्मवीर दिलीप रहाटे यांचे स्वप्न होते. मात्र त्यांच्यानंतर त्यांचे नाव घेऊन काम करणाऱ्यांनी केवळ राजकारण केले..त्यामुळे धर्मवीर दिलीप रहाटे यांना अपेक्षित असलेला मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मी कटिबद्ध आहे असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत उमेदवार डॉ.ऋतुजा चव्हाण यांनी केले. आज,५ नोव्हेंबर रोजी धर्मवीर दिलीप रहाटे यांची कर्मभूमी असलेल्या शेंदला येथे डॉ. ऋतुजा चव्हाण यांनी आपल्या प्रचाराचा नारळ फोडला यावेळी त्या बोलत होत्या. शेतकरी नेते डॉ. ज्ञानेश्वर टाले, ऋषांक चव्हाण यांच्यासह वंचित बहुजन आघाडी व शेतकरी क्रांतिकारी संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मेहकर विधानसभा मतदारसंघ ५० वर्षे मागे गेला आहे. केवळ राजकारण करण्याचे काम इथे सुरू आहे. राज्यात, केंद्रात सत्तेत असलेल्या लोकांना शेतकऱ्यांच्या दुःखाशी काही देणे घेणे नाही. शेतकरी मेला तरी त्यांना फरक पडत नाही. इथल्या लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर विधानसभेत आवाज उठवला का? असा सवाल यावेळी डॉ.ऋतुजा चव्हाण यांनी केला. मी राजकारण करण्यासाठी नव्हे तर विकासकारण करण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात आहे. मायबाप जनतेने एकदा सेवेची संधी द्यावी, दुसऱ्यांदा तुमच्यासमोर येताना विकास कामांची यादीच घेऊन येते असेही त्या म्हणाल्या.
ऋतुजा चव्हाण सर्वसामान्यांचे नेतृत्व...
ऋतुजा चव्हाण यांना सर्वसामान्य कुटुंबातून आणि शेतकरी चळवळीतून समोर आलेले आहेत. सामान्यांच्या वेदनांची त्यांना जाणीव आहे. ऋतुजा चव्हाण हे विकासाचे व्हिजन असलेले नेतृत्व आहे.त्यामुळे तुमच्या आमच्या हक्काच्या आमदार म्हणून तुमच्या आमच्यासाठी विधानभवनात आवाज उठवणाऱ्या आमदार म्हणून आपल्याला त्यांना पहायचे आहे असे प्रतिपादन शेतकरी नेते डॉ. ज्ञानेश्वर टाले यांनी केले.