उर्वरित पीकविमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा, अन्यथा खबरदार! आंदोलनाचे रान पेटवू; युवानेते ऋषांक चव्हाण यांचा इशारा! ज्ञानेश्वर टाले म्हणाले, शेतकऱ्यांची थट्टा थांबवा, नाहीतर परिणाम भोगावे लागतील...
Oct 12, 2024, 10:28 IST
मेहकर(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): राज्य सरकारला शेतकऱ्यांशी काहीही देणेघेणे नाही.शेतकरी मेला तरी टाळूवरचे लोणी खायला हे भामटे तयार आहेत. सरकारने पीकविमा कंपनीला पैसे दिले नाहीत त्यामुळे पीकविमा रखडला आहे, अन्यथा पीकविमा कंपनीच्या विरोधात सरकार गुन्हे का दाखल करत नाहीत असा सवाल करीत पीकविमा कंपनीने उर्वरित पिकविमा शेतकऱ्यांच्या खात्यात तातडीने जमा करावा अन्यथा आंदोलनाचे रान पेटवू असा गर्भित इशारा शेतकरी नेते तथा सहकार चळवळीतील युवा नेतृत्व ऋषांक चव्हाण यांनी दिला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर टाले यांनीही सरकारला आडव्या हाताने घेत शेतकऱ्यांची थट्टा थांबवली नाही तर परिणाम भोगायला तयार रहा असा दम भरला आहे. मेहकर तालुक्यातील दुर्गबोरी येथे आयोजित शेतकऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते.
शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात डॉ. ज्ञानेश्वर टाले, ऋषांक चव्हाण या नव्या दमाच्या तरुण नेत्यांनी मेहकर विधानसभा मतदारसंघात मोठी संघटनात्मक बांधणी केली आहे. जिल्हा पातळीवर वेळोवेळी होणाऱ्या शेतकरी आंदोलनात मेहकर आणि लोणार तालुक्यातील शेतकऱ्यांचा मोठा सहभाग असतो. दरम्यान सध्या मेहकर व लोणार तालुक्यातील शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी गावभेट दौरे सुरू असून गावागावात होणाऱ्या कॉर्नर बैठकांना प्रचंड असा प्रतिसाद मिळत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डॉ.ऋतुजा ऋषांक चव्हाण या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत, त्या देखील गावोगावी भेटी - गाठी घेत आहेत. दरम्यान दुर्गबोरी येथे आयोजित बैठकीला संबोधित करतांना डॉ. ज्ञानेश्वर टाले आणि ऋषांक चव्हाण यांनी संबोधित केले.यावेळी दोन्ही नेत्यांनी शासनाच्या धोरणांचा खरपूस समाचार घेतला.
शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी वेळोवेळी केलेल्या आंदोलनांमुळे काही शेतकऱ्यांच्या खात्यावर पिक विम्याची रक्कम जमा करण्यात आली. मात्र मेहकर लोणार तालुक्यातील बहुतांशी शेतकऱ्यांच्या खात्यावर अद्याप पिक विम्याची रक्कम जमा झालेली नाही. विमा कंपनीने शेतकऱ्यांची थट्टा करू नये, आठ दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर पिक विम्याची रक्कम जमा करावी अन्यथा शेतकरी आंदोलनामुळे होणाऱ्या परिणामांना समोर जाण्याची तयारी सरकारने ठेवावी असा इशारा डॉ. ज्ञानेश्वर टाले यांनी दिला.
युवानेते ऋषांक चव्हाण म्हणाले की, शेतकऱ्यांच्या हितासाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर आणि डॉ. ज्ञानेश्वर टाले सातत्याने लढा देत आहेत. त्यांच्या प्रयत्नामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम जमा झाली आहे, मात्र अद्याप बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा जमा झाला नाही. पिक विमा कंपनी आणि सरकार यांच्यात साटे -लोटे असल्याचा आरोप आमचे नेते रविकांत तुपकर करतात तो अगदी १००१ टक्के खरा आहे. अन्यथा पिक विमा कंपनीच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करायला सरकार का कचरत आहे? निवडणुकीसाठी फंड उभा करायला ही कंपनीचं सरकारला मदत करत असेल त्यामुळे सरकार पिक विमा कंपनीप्रती नरमाईची भूमिका घेत असेल असा संशय असल्याचे ऋषांक चव्हाण यावेळी म्हणाले...