बुलडाण्यात बळीराजाचे जंगी शक्ती प्रदर्शन!; शासन थरारले, प्रशासन हादरले, बुलडाणा दुमदुमले!!

१२ नोव्हेंबरपासून राज्यात सोयाबीन- कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा वणवा पेटणार!, एल्गार मोर्चात रविकांत तुपकरांची घोषणा

 

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः ऑक्टोबर हिटला न जुमानता हजारो कार्यकर्त्यांचा ओसंडून वाहणारा उत्साह, अस्मानी सुलतानाच्या तडाख्याने जमीनदोस्त होऊनही नव्या उमेदीने संघर्षासाठी रस्त्यावर उतरलेले शेतकरी बांधव, दिवाळीच्या तयारीला फाटा देत मोर्चामध्ये सहभागी झालेल्या आया-बहिणी, वाहन व आंदोलकांनी गजबजलेला चिखली मार्ग, हातात रुम्‍हणे अन्‌ वाळलेली सोयाबीनचं पीक घेत गगनभेदी घोषणा करणारी शेतकऱ्यांची तरणीबांड पोरं, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत सहभागी झालेले सर्वपक्षीय पदाधिकारी अशा थाटात अन्‌ दिमाखात अन्‌ बुलडाण्याची ग्रामदेवता आई जगदंबेला कुर्निसात करून व साकडे घालत आज, ३१ ऑक्‍टोबरला दुपारी रणरणत्या उन्हात कापूस- सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार मोर्चा निघाला.  मोर्चाच्या समारोपात आपल्या तडाखेबंद व रोख"ठोक' भाषणात बोलताना केंद्र व राज्य शासनावर टीकेची तोफ डागताना रविकांत तुपकर यांनी ११ नोव्हेंबरपर्यंत सर्व मागण्या मान्य झाल्या नाही तर १२ नोव्हेंबरपासून राज्यात आंदोलनाची आग पेटवू, असा घोषणावजा इशारा देतानाच बळीराजांना न्याय मिळाल्याशिवाय जहाल आंदोलनरुपी तलवार म्यान करणार नसल्याचे ठणकावून सांगितले.

"स्वाभिमानी'चे संपर्क कार्यालय ते जिल्हाधिकारी कार्यालय परिसर असा विस्तीर्ण पट्टा व्यापणाऱ्या या महामोर्चाला दुपारी एकच्या ठोक्याला जोशात प्रारंभ झाला. केंद्र शासनाने सोयाबीनला ८ हजार तर कपाशीला १२ हजार प्रति क्विंटल रुपये किमान भाव राहावा यासाठी धोरण आखावे, जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरच्या मर्यादेशिवाय सरसकट ५० हजार रुपये मदत द्यावी, सोयापेंड आयात बंद करून पामतेल व खाद्य तेलावरील आयात शुल्क वाढवावे, लॉकडाऊन काळातील घरगुती वीजबिल माफ करून कनेक्शन कापणे बंद करावे, खाद्य तेल व तेलबियांवरील साठा मर्यादा अट शिथिल करावी, खरडून गेलेल्या नदीकाठच्या शेत जमिनी तयार करण्यासाठी १०० टक्के नुकसान भरपाई द्यावी, पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम तात्काळ जमा करावी, कृषी पंपांचे बिल माफ करावे आदी मागण्यांसाठी एल्गार मोर्चा काढण्यात आला. जगदंबा देवी मंदिरापासून जिजामाता महाविद्यालय, एडेड स्‍कूल, तहसील चौक, डीएसडी मॉलमार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात दाखल झाला. स्टेट बँकेजवळ उभारलेल्या व्यासपीठाजवळ मोर्चा पोहोचला तेव्हा "स्वाभिमानी'चे नेते राजू शेट्टी, रविकांत तुपकर अन्‌ स्वाभिमानी जिंदाबादच्या आक्रमक घोषणांनी परिसर दणाणला!

एकीची वज्रमूठ, टाळ्यांचा कडकडाट अन्‌ आंदोलनाची गर्जना...
यावेळी विविध मान्यवरांनी आपल्या भावना व शेतकऱ्यांच्या वेदना मांडल्या. आरपारच्या आंदोलनात आपला जीव गेला तरी बेहत्तर पण आता सोयाबीन कापूस उत्पादकांना न्याय मिळवून दिल्याशिवाय मागे हटने नाही, असे श्री. तुपकर यांनी यावेळी निक्षून सांगितले. छातीला माती लावून या आंदोलनात उतरणार असल्याचे सांगून यासाठी मी आमचे नेते राजू शेट्टी यांच्यासह सोया कॉटन बेल्ट पिंजून काढणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. केंद्र शासनाच्या आयात शुल्क, स्टॉक मर्यादा, सोया पेंड, पाम तेल आयात आदी चुकीच्या निर्णयामुळे सोयाबीनचे भाव पडल्याचे सांगतानाच त्यांनी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांचे वाभाडे काढले. स्थानिक व्यापाऱ्यांना सोयाबिनचा साठा करण्यास मर्यादा असली तरी आयात निर्यात करणाऱ्यांना मात्र मोकाट रान सोडण्यात आले आहे, असा केंद्राचा गोरखधंदा असून यातून अंबानी, अदानी अब्जावधीची  कमाई करणार आहे, असा आरोप त्यांनी केला. जिल्ह्यातील ७५ टक्के सोयाबीन उद्‌ध्वस्त झाली, पण मदत किती मिळाली? असा सवाल तुपकरांनी यावेळी केला. पीक विमा कंपन्यांनी ५८०० कोटी प्रीमियम पोटी उकळले अन्‌ शेतकऱ्यांना ८०० कोटी टेकविले. त्यांना आपणही वैतागलो, आता स्वाभिमानीनेच आंदोलन करावे, असे कृषी मंत्री दादा भुसे म्हणतात. यामुळे केंद्रच काय राज्य सरकारही शेतकऱ्यांचे वैरी आहेत, असा आरोप त्यांनी केला. सरकारकडे मंत्री, आमदार, खासदार, कर्मचारी यांना द्यायला पैसे आहेत, पण कास्तकारांना द्यायला कवडी पण नाही, यांना राजू शेट्टींच्या  आंदोलनाचीच भाषा कळते. त्यासाठी १२ तारखेपासून दीर्घ आंदोलन उभारणे क्रमप्राप्त ठरते आहे. विदर्भातील शेतकऱ्यांनी प्राणपणाने या आंदोलनात उतरणे काळाची गरज असल्याचे सांगून आता मरायचे नाही तर मारायचे, असा रोख ठोक सल्ला त्यांनी दिला. शेतातील कनेक्शन कापण्यासाठी आलेल्‍या महावितरणच्या कर्मचाऱ्यांच्या XXवर लाथा हाणा, असे ते म्‍हणाले. यावेळी दामू अण्णा इंगोले, पवन देशमुख, ज्ञानेश्वर खरात, अजय घुगे यांची समयोचित भाषणे झालीत.

हायलाईट्स...

  • एल्गारकरिता महागड्या गाड्या, मेटॅडोअर, मिनी ट्रक, क्रूझर, काळी पिवळी, ऑटो अशा मिळेल त्या गाड्यांनी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आंदोलक बुलडाण्यात  दाखल झाले.
  • जमियत - उलेमा- ए- हिंदतर्फे मोर्चेकऱ्यासाठी पेय जलाची व्यवस्था करण्यात आली.
  • आसूड, रुम्‍हणे, वाळलेली सोयाबीन हाती घेऊन सहभागी झालेले आंदोलक आकर्षण ठरले.
  • बीएड कॉलेज परिसर नगारे व डफड्यांच्या निनादाने दुमदुमला.
  • सजविलेल्या बैल बंड्यामोर्चा निमित्त शहरवासीयांना पहावयास मिळाल्या.
  • संघटनेचे आधारवड स्वर्गीय राणा चंदन यांची व्यासपीठावरील प्रतिमा त्यांच्या आठवणी जागा करणाऱ्या ठरल्या. राणांच्या मातोश्रींनी प्रतिमेला हार अर्पण करताच अनेक कार्यकर्त्यांना गहिवरून आले.