पीक कर्जाची संथगती शेतकऱ्यांना त्रासदायक !
पीक प्रक्रिया गतिमान करण्याची जालिंधर बुधवंत यांची मागणी! सुपीक जमिनी घेणारा भक्तिमार्ग कशाला हवाय ? शिवसेनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
Jun 28, 2024, 18:09 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): थेट बँक निहाय पीक कर्जाचा आढावा घेतल्यानंतर शिवसेनेच्या वतीने जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांच्या नेतृत्वात आज जिल्हाधिकाऱ्यांना रीतसर निवेदन देण्यात आले. पीक कर्जाची संथगती ही शेतकऱ्यांना त्रासदायक असून तात्काळ ही प्रक्रिया गतिमान करण्यासाठी पावलं उचलावी, अन्यथा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) जिल्हाभर आंदोलन छेडेल असा इशारा जालिंदर बुधवत यांनी दिला आहे. महत्त्वाचे म्हणजे कुठलीही मागणी नसताना जिल्ह्यात भक्तिमार्गाच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी संपादित करण्याचा डाव आखल्या जात असून याला शिवसेनेचा तीव्र विरोध आहे, ही प्रक्रिया देखील रद्द करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
यावेळी देण्यात आलेल्या निवेदनांमध्ये नमूद आहे की, अस्मानी संकटाच्या मालिकेमध्ये मायबाप शेतकरी पुन्हा एकदा नव्या हंगामासाठी जोमाने तयारीला लागलेला आहे. पाऊस कमी जास्त पडत असला तरी बऱ्याच भागात पेरण्या सुरू झालेले आहेत. मात्र आर्थिक विवंचनेत असलेल्या शेतकऱ्यांना पीक कर्ज हा मोठा आधार असतो. असे असतानाही बँक व्यवस्थापनाकडून शेतकऱ्यांना नाहक त्रास दिल्या जात आहे. पीक कर्ज वाटपाची संथगती ही शेतकऱ्यांना त्रासदायक ठरत आहे. त्यामुळे खते, बी -बियाणे खरेदीसाठी उधारीवर आणि खास करून खाजगी सावकारीकडे शेतकऱ्यांना वळावे लागले आहे. पदरमोड करून शेतकरी जिल्ह्यात पेरणी हंगामाला सामोरे जात आहेत. त्यामुळे बँकांना पीक कर्ज वाटपाची गती वाढवण्यासाठी आदेश होणे आवश्यक आहे. ज्या ठिकाणी राष्ट्रीयकृत बँकांच्या शाखांची कमतरता असेल तिथे "कर्ज मेळाव्याच्या" स्वरूपामध्ये पावले उचलणे गरजेचे आहे. नवीन खातेदारांना पीक कर्ज तात्काळ देण्यासाठी सूचना जिल्हाधिकारी स्तरावर व्हाव्यात. सेंट्रल बँक ऑफ इंडिया या बँकेला कर्ज देण्याचे अधिकार शाखा व्यवस्थापक यांना देण्यात यावे. बँकांना शाखा निहाय बुलढाणा व मोताळा तालुक्यात पीक कर्ज संदर्भातला आढावा घेतला यात शेतकऱ्यांची ससेहलपट होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने काही मुद्दे आढळून आले आहेत. त्यापैकी शेलगाव बाजार तालुका मोताळा येथील ग्रामीण बँकेत नवीन ५५ शेतकऱ्यांच्या कर्जाच्या फाईल बाकी आहेत. पिंपरी गवळी तालुका मोताळा येथील महाराष्ट्र बँक ऑफ इंडिया मध्ये ३० शेतकऱ्यांच्या नवीन कर्ज वाटप बाकी आणि १०० लोकांचे ओटीएस या स्कीम मध्ये पैसे भरून त्यांना अद्याप कर्ज वाटप झाले नाही. पाडळी जिल्हा तालुका बुलढाणा येथील सेंट्रल बँकेत ३०० शेतकऱ्यांचे महात्मा फुले कर्ज वाटप योजनेमध्ये ३०० शेतकरी कर्जमाफी योजनेत पात्र झाली असून त्यांना कुठल्याच प्रकारचे नवीन कर्ज वाटप अद्याप दिलेले नाही. एकूणच जवळपास जिल्ह्यातील सर्व शाखांमध्ये नवीन कर्ज वाटपाची टक्केवारी २५ ते ३० टक्के आहे. या सर्व प्रक्रियेला गती आली पाहिजे. तसेच सर्व शाखांना नवीन पीक कर्ज संदर्भात सर्व शाखांना सुचित करावे तसेच पीक कर्ज वाटप करण्याचे अधिकार स्थानिक बँक व्यवस्थापकांना देण्यात यावी ते अधिकार स्थानिक नसल्यामुळे जवळपास एक ते दोन महिना वेळ लागतो. त्यामुळे शेतकऱ्यांना अडचण होते..
सोबतच भक्ती मार्गाच्या नावाखाली सिदखेडराजा ते शेगाव या मार्गावरील शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी जाणार असल्याने मोठी नाराजी, प्रचंड असंतोष शेतकऱ्यांमध्ये आहे. आवश्यकता नसताना या मार्गासाठी होरा कशाला हा प्रश्न आहे. शेतकऱ्यांनी याबाबत आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला देखील शिवसेनेचा पाठिंबा असून तात्काळ ही प्रक्रिया रद्द करावी.तसेच पिक कर्ज वाटपाच्या या प्रक्रियेला गती न मिळाल्यास शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशारा सुद्धा देण्यात आला आहे.
निवेदन देतेवेळी तालुका प्रमुख लखन गाडेकर, किसान सेना जिल्हा प्रमुख गजानन उबरहंडे, किसान सेना तालुका प्रमुख अशोक गव्हाणे, उप तालुका प्रमुख विजय इतवारे, संजय गवळी, एकनाथ कोरडे ,गणेश पालकर, आशिष खरात, ओमप्रकाश नाटेकर, मोहम्मद सोफियान, समाधान बुधवत, शेषराव सावळे, मधुकर महाले, मोहन निमरोट, संजय शिंदे, श्याम खडके, रुपेश लकडे, ज्ञानेश्वर शेळके, राहुल जाधव, शेख इस्माईल, अनिल जाधव, भीमराव लवंगे, ज्ञानेश्वर गुळवे, शेख इस्माईल, गजानन व्यवहारे, सतीश शेळके, सचिन काळे, सचिन पाटील, जय मुळवंडे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच शेतकरी बांधव उपस्थित होते.