मतमोजणी अपडेट! दुसऱ्या फेरीतही धिरज लिंगाडेची आघाडी आणखी वाढली; रणजित पाटलांना मोठा धक्का देणारं का?
रणजित पाटील यांना एकतर्फी विजयाची आशा होती. मात्र रणजित पाटलांच्या आशेला लिंगाडे यांनी चांगलाच सुरुंग लावला . ऐनवेळी उमेदवारी जाहीर होऊनही लिंगाडे यांनी प्रचारात जोरदार आघाडी घेतली होती तर दुसरीकडे आपला पराभव होणारच नाही असे गृहीत धरून रणजित पाटील यांनी प्रचाराच्या तंत्राकडे नीट लक्ष दिले नाही. त्याचा थेट परिणाम आता मतमोजणी मध्ये समोर येतांना दिसतोय. पोस्टल मतदानात सुद्धा लिंगाडे यांनी आघाडी घेतली होती.त्यानंतर पहिल्या फेरीत लिंगाडे यांना ११ हजार ९९२ तर भाजपच्या रणजित पाटलांना ११ हजार ३१२ मते मिळाली.
दरम्यान दुसऱ्या फेरीच्या मतमोजणीनंतर धिरज लिंगाडे यांना २३ हजार ४१७ तर रणजित पाटील यांना २१ हजार ९७१ मते मिळाली. तिसऱ्या फेरीच्या मतमोजणीनंतर लिंगाडे यांच्या पारड्यात २८०३३ तर रणजित पाटील यांच्या पारड्यात २६१६२ मते आहेत. आता शेवटची फेरी बाकी असून यातील मतमोजणी नंतर किती मते बाद ठरली यावरून विजयासाठी आवश्यक असलेल्या मतांचा कोटा ठरेल. पहिल्या पसंतीच्या मतांनीच विजयाचा कोटा पूर्ण केलेल्या उमेदवाराला विजयी घोषित करण्यात येईल,मात्र तसे न झाल्यास दुसऱ्या पसंतीची मते मोजावी लागतील.
निर्णायक निकाल हाती येण्यासाठी दुसऱ्या किंवा तिसऱ्या पसंतीची मते मोजावीच लागण्याची चिन्हे सध्यातरी दिसत आहेत.