काँग्रेस जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रेंच्या नेतृत्वात उद्या बुलडाण्यात काँग्रेसचा आक्रोश मोर्चा! राज्य आणि केंद्र सरकारवर गंभीर आरोप!
राज्य सरकारच्या आशीर्वादानेच अंमली पदार्थांची तस्करी सुरू आहे म्हणाले...
Nov 9, 2023, 08:18 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): केंद्रातील भाजप आणि राज्यातील खोके सरकारच्या गलथान आणि जनतेला मारक ठरणाऱ्या चुकीच्या धोरणामुळे दिवसेंदिवस महागाई, बेरोजगारी, महिलांवरील अत्याचार वाढत आहे. सामाजिक द्वेष आणि जातीय दंगलीमुळे जिल्ह्यातील जनता हैराण आहे. जिल्ह्यात सार्वत्रिक दुष्काळाची स्थिती असताना केवळ शिंदे गटाच्या आमदारांच्या तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्यात आला, दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्याचे जगणे मुश्कील झाले आहे. असे असताना केंद्र आणि राज्य सरकारच्या आशीर्वादानेच राज्यात अंमली पदार्थांची तस्करी सुरू असल्याचा गंभीर आरोप करीत जिल्हा काँग्रेसच्या वतीने सरकारच्या धोरणांचा निषेध करण्यासाठी १० नोव्हेंबरला आक्रोश मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी केली आहे.
जाहिरात 👆
१० नोव्हेंबरला सकाळी ११ वाजता बुलडाणा शहरातील गांधी भवन परिसरात असलेल्या जिल्हा काँग्रेस मुख्यालयातून प्रारंभ होणारा हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. राज्यात सरसकट दुष्काळ जाहीर करावा, अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी,सर्व प्रकारच्या पीक विम्याची मदत तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी.सोयाबीन कापसासह सर्व पिकांचे हमीभाव केंद्रे तात्काळ सुरू करावे. घरघुती वापरातील गॅस, पेट्रोल, डिझेल च्या वाढलेल्या किंमती कमी कराव्या. नैराश्यात अडकेलेल्या सुशिक्षित बेरोजगारांसाठी तात्काळ मोठ्या प्रमाणात शासकीय नोकरभरती करावी यासह इतर मागण्यांसाठी हा आक्रोश मोर्चा असणार आहे.
या मोर्चात काँग्रेस पक्षाचे नेते, आजी माजी आमदार, प्रदेश, जिल्हा, तालुका, स्थानिक स्वराज्य संस्थांचे आजी माजी पदाधिकारी, शेतकरी, शेतमजूर, शिक्षक,बेरोजगारांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे..