ओबीसी आरक्षणावर निवडून आलेल्या काँग्रेस नगरसेवकाचे जात वैधता प्रमाणपत्र रद्द; खामगावच्या राजकारणात खळबळ....

 
 खामगाव(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):शहरातील काँग्रेसचे विजयी नगरसेवक मो. ईसा मो. मुसा (प्रभाग २ अ) यांचे ‘कासार’ जात वैधता प्रमाणपत्र जात पडताळणी समितीने रद्द केल्याने जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. ओबीसी आरक्षणातून निवडून आलेल्या नगरसेवकांचा जात दावा समितीने अमान्य ठरविल्याने या प्रकरणाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
समितीच्या चौकशीत अनेक धक्कादायक बाबी समोर आल्याची माहिती आहे. शाळेच्या मूळ दाखल्यांमध्ये, कुटुंबीयांच्या जुन्या नोंदींमध्ये तसेच इतर अधिकृत कागदपत्रांमध्ये “मुसलमान” अशी नोंद असल्याचे समितीच्या निदर्शनास आले. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत ओबीसी आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी ‘कासार’ प्रवर्गातील जात प्रमाणपत्र सादर करण्यात आल्याचे चौकशीत स्पष्ट झाल्याचे सांगितले जात आहे.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत दक्षता पथकाने स्वतंत्र चौकशी केली होती. चौकशी अहवालाच्या आधारे जात पडताळणी समितीने संबंधित दावा फेटाळत दोन प्रमाणपत्रे थेट रद्द करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे.
समितीने आपल्या आदेशात ‘कासार’ जातीचा कोणताही ठोस, विश्वासार्ह व सातत्यपूर्ण पुरावा उपलब्ध नसल्याचे स्पष्ट नमूद केल्याचे समजते. या निर्णयामुळे संबंधित नगरसेवकांच्या निवडीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, ओबीसी आरक्षणातून मिळालेल्या लाभांचाही फेरविचार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, कथित खोट्या जात प्रमाणपत्राच्या आधारे निवडणूक लढविण्यात आल्याचा आरोपही आता पुढे आला असून, या प्रकरणाचे पडसाद आगामी काळात स्थानिक राजकारणात उमटण्याची चिन्हे आहेत.