भूषणावह..! आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या श्रीनगर येथील मुख्य कार्यक्रमाच्या नियोजनाची जबाबदारी ना.प्रतापराव जाधवांवर!

उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत मुख्य कार्यक्रमात होणार सहभागी; श्रीनगर येथे पोहोचून कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा घेतला आढावा....

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): संपूर्ण जगाचे लक्ष लागून असलेल्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम यंदा जम्मू-काश्मीरमधील श्रीनगर येथे होणार आहे. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. विशेष म्हणजे मोदी यांच्यासोबत केंद्रीय आयुष मंत्री(स्वतंत्र प्रभार) प्रतापराव जाधव मुख्य कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. आणखी गौरवाची बाब ही की उद्या श्रीनगर मध्ये होणाऱ्या मुख्य कार्यक्रमाचे नियोजन ना.प्रतापराव जाधव यांच्या देखरेखीखाली करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी ना.जाधव गेल्या ५ दिवसांत दोन श्रीनगरला जाऊन आले आहेत. उद्या होणाऱ्या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीची पाहणी करण्यासाठी ना.प्रतापराव जाधव आजच श्रीनगर मध्ये पोहचले असून त्यांनी कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला. मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर दहाच दिवसांत ना.प्रतापराव जाधव देशाच्या केंद्रस्थानी आल्याने बुलडाणा लोकसभा मतदारसंघासाठी, जिल्ह्यासाठी ही बाब नक्कीच भूषणावह आहे.
  २७ सप्टेंबर २०१४ रोजी संयुक्त राष्ट्राच्या महासभेत २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा व्हावा असा प्रस्ताव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडला होता. या प्रस्तावाला १९३ पैकी १७५ देशांनी होकार दिला होता. २१ जून २०१५ रोजी ऐतिहासिक पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा झाला होता. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमाच्या आयोजन नियोजनाची संपूर्ण जबाबदारी ही आयुष मंत्रालयाची आहे. त्यामुळे मंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर ना.प्रतापराव जाधव यांच्यावरील जबाबदारी वाढली होती. श्रीनगर येथील मुख्य कार्यक्रमासह देशभरातील सर्वच प्रमुख कार्यक्रमांचे आयोजन नियोजन आयुष मंत्रालयाच्या देखरेखीखाली होणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळातील सर्वच मंत्र्यांना देशभरातील विविध कार्यक्रमात सहभागी होण्याच्या सूचना देण्यात आले आहेत. स्वतः ना प्रतापराव जाधव हे नरेंद्र मोदी यांच्यासोबत श्रीनगर येथील मुख्य कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. आजच ना.प्रतापराव जाधव यांनी श्रीनगर येथे पोहोचून कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेऊन अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या.