आ. श्वेताताई महालेंसह शेतकऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल
महावितरणचे कार्यकारी अभियंता बद्रीनाथ उत्तमराव जायभाये (५३) यांनी शहर पोलीस स्टेशनला तक्रार दिली, की ३ डिसेंबर रोजी ते आणि त्यांचे सहकारी नेहमीप्रमाणे कामकाज करत असताना दुपारी ३ वाजता चिखलीच्या आमदार सौ. श्वेताताई महाले यांच्या नेतृत्वात डॉ. उंबरहंडे, ॲड. सुनील देशमुख, ज्ञानेश्वर सुसर, देवीदास पाटील, सुरेश चौधरी, सुभाष जगताप, ॲड. मोहन पवार, संदीप उगले, मंदार बाहेकर, अरविंद होंडे, पद्माकर बाहेकर व इतर ४० ते ५० जणांचा जमाव कोणतीही पूर्वसूचना न देता कार्यालयातील दालनात आले.
जवळजवळ दोन ते अडीच तास शासन विरोधी व महावितरण विरोधी घोषणाबाजी करत त्यांनी घेराव घातला. थकबाकीदार कृषीपंप विद्युत ग्राहकांचा विद्युत पुरवठा जोडण्याच्या सूचना उपअभियंता यांना देण्यात आल्याचे व ४ डिसेंबरपर्यंत खंडीत केलेला वीज पुरवठा जोडावा, असे आश्वासन लिहून घेतले. त्यावर कार्यकारी अभियंत्यांसह वरिष्ठांची स्वाक्षरी घेतली. या तक्रारीवरुन पोलिसांनी आमदार सौ. श्वेता महाले पाटील, डॉ. उंबरहंडे, ॲड. सुनील देशमुख, ज्ञानेश्वर सुसर, देविदास पाटील, सुरेश चौधरी, सुभाष जगताप, ॲड. मोहन पवार, संदीप उगले, मंदार बाहेकर, अरविंद होंडे, पद्माकर बाहेकर यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.
शेतकऱ्यांसाठी हजार गुन्हे दाखल झाले तरी मागे हटणार नाही...
शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी आम्ही लढत आहोत. मात्र सरकार केवळ वसुली करण्यात व्यस्त आहे. शेतकऱ्यांसाठी लढणाऱ्यांचा आवाज दाबण्याचा महाविकास आघाडी सरकार प्रयत्न करीत आहे. मात्र शेतकऱ्यांसाठी एक काय हजार गुन्हे दाखल झाले तरी आम्ही मागे हटणार नाही.
- सौ. श्वेताताई महाले पाटील, आमदार, चिखली