महिला नेतृत्वाला साथ देणारा चिखली मतदार संघ! १९९५ पासून चार वेळा दिली महिला उमेदवारालाच संधी; आता पुन्हा इतिहासाची पुनरावृत्ती?

 
 बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा जिल्ह्याची राजकीय राजधानी म्हणून चिखली ची ओळख आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून तर आतापर्यंत हा परिसर आपली वेगळी ओळख रुजवून आहे. अलीकडे पाच वर्षात ताई आणि भाऊ यांच्यातील राजकीय वाद आणि संघर्ष जिल्ह्याने अनुभवले. चिखली विधानसभा मतदारसंघ तसा पाहिला तर महिला नेतृत्वाला साथ देत आलेला आहे. गेल्या तीन दशकातील आकडे या शीर्षकाला पूरक ठरतील असेच आहेत. 

९० नंतर जागतिकीकरणाचे वारे जोरात वाहत असताना राजकीय परिवर्तन देखील घडून आले. राज्यामध्ये ९२ च्या दंगली अनुभवल्या नंतर राजकीय स्थित्यंतरे देखील घडून आली. भाजप -सेना युतीने १९९५ मध्ये सत्ता स्थापन केली. हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व मातोश्रीचा असलेला दबदबा आणि त्याकाळी प्रमोद महाजन , गोपीनाथ मुंडे यांच्यासारखी समन्वयी भाजपनेते युतीला लाभलेले होते. बुलडाणा जिल्ह्यात पाणीदार नेतृत्व असलेले भारतभाऊ बोंद्रे यांचा पराभव करत १९९५ ला रेखाताई खेडेकर यांनी भाजपचे कमळ चिखली विधानसभा मतदार संघामध्ये फुलवलं.

१९९९, २००४ अशी विजयाची हॅट्रिक देखील रेखाताईंनी साधली. आपल्या संयमी आणि दूरदृष्टीने सांभाळलेला मतदार संघ त्या पुन्हा एकदा सर करतील असे चित्र असताना २००९ मध्ये विद्यमान आमदार असूनही रेखाताईंचे तिकीट कापले गेले. त्यावेळी भाजप नेतृत्वावर असलेला वैचारिक दबाव रेखाताई खेडेकर यांना थांबवून गेला. मात्र हा मतदारसंघ भाजपच्या ताब्यातून त्यावेळी निसटला. प्रकाशबुवा जंवंजाळ यांचा पराभव बोंद्रे कुटुंबातील राहुल बोंद्रे यांनी करून आमदारकी मिळवली. २०१४ ला सुरेशआप्पा खबुतरे यांचाही राहुल बोंद्रे यांनी पराभव करत दुसऱ्यांदा विधानसभा गाठली. मात्र महिला नेतृत्वाने साधलेली विजयी हॅट्रिक पाहता जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राजकारणात सक्रिय झालेल्या श्वेताताई महाले यांना सभापतीपद भाजपने दिले आणि नंतर लगेच २०१९ विधानसभा निवडणुकीत त्यांना उमेदवारी देखील दिली. रेणुका नगरी असलेल्या चिखलीने महिला उमेदवाराला साथ दिली आणि बदल घडला. श्वेताताईंच्या रुपाने हा मतदार संघ पुन्हा एकदा भाजपच्या ताब्यात आला.

१९९५ पासून चा इतिहास पाहिला तर दोन अपवाद वगळता(त्यावेळी भाजपकडून महिला रिंगणात नव्हत्या)चार वेळा महिला उमेदवारालाच चिखली विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदारांनी संधी दिल्याचे दिसते आहे. आता २०२४ च्या निवडणुकीतही ताई विरुद्ध भाऊ अशी लढत सरळ सरळ होणार आहे. त्यामुळे इतिहास पुनरावृत्ती दर्शवतो की काही बदल होतो हे आपल्याला २३ नोव्हेंबरला मतमोजणी अंती दिसून येईल...