मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आजचा दौरा रद्द; उद्या येणार बुलडाण्यात! खा.प्रतापराव जाधवांच्या विजयाचे प्लॅनिंग करणार! आधी निवांत लॉनवर बैठक नंतर ओंकार लॉनवर कार्यकर्ता मेळाव्याला करणार संबोधित..
Apr 13, 2024, 09:00 IST
बुलढाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे १४ एप्रिल रोजी बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर येत आहे. यादरम्यान ते बुलढाणा शहरात महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेणार असून नंतर कार्यकर्ता मेळाव्याला संबोधित करणार आहेत.
महायुतीचे उमेदवार खासदार प्रतापराव जाधव यांच्या प्रचारार्थ आज,१३ एप्रिल रोजी शेगाव येथे मेळावा आयोजित करण्यात आला होता. मात्र मुख्यमंत्र्यांचा हा दौरा काही तांत्रिक अडचणीमुळे पुढे ढकलण्यात आला आहे. आता मुख्यमंत्री उद्या १४ एप्रिल रोजी बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर येत आहे. यावेळी ते अजिंठा रोडवरील हॉटेल निवांत येथे दुपारी १ वाजेच्या दरम्यान महायुतीच्या प्रमुख पदाधिकाऱ्याची बैठक तर दुपारी २ वाजता येथील ओंकार लॉन धाड नाका येथे महायुतीच्या कार्यकर्ता पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेण्यात येणार आहे.
या बैठकीला सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेंद्र शिंगणे, जळगांव जामोद मतदारसंघाचे आमदार संजय कुटे, मेहकर विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय रायमुलकर, खामगांव मतदारसंघाचे आमदार आकाश फुंडकर, बुलढाणा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड, चिखली मतदारसंघाच्या आमदार सौ. श्वेताताई महाले, आमदार वसंतराव खंडेलवाल, आमदार किरण सरनाईक, माजी खासदार सुखदेव नंदाजी काळे, माजी आमदार भारत बोंद्रे, चैनसुख संचेती, विजयराज शिंदे, तोताराम कायंदे, धृपदराव सावळे, शशीकांत खेडेकर हे उपस्थित राहणार आहेत.
या बैठकीला बुलढाणा लोकसभा मतदार संघातील महायुतीमध्ये समाविष्ट असलेले शिवसेना, भारतीय जनता पक्षाचे, राष्ट्रवादी काँग्रेस, रि.पा. ई. (आठवले गट), पि.री. पा. व रयत क्रांती संघटना, रा. स. पा, तसेच मित्रपक्षांच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी बैठकीला उपस्थित राहावे, असे आवाहन महायुतीच्या वतीने करण्यात आली