BREAKING लाडकी बहीण योजनेबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महत्वाचे विधान! म्हणाले, दीड हजारांवर आम्ही थांबणार नाही तुम्ही ताकद द्या; योजना बंद पडणार नाही!

बुलडाण्यात आणखी काय म्हणाले मुख्यमंत्री वाचा? 
 

बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना बंद पडणार असल्याच्या अफवा विरोधक पसरवत आहेत. मात्र ही योजना बंद होणार नाही असा शब्द देत दीड हजारांवर आम्ही थांबणार नाही, दीड हजारांचे 2000 करू 2000  चे 2500 करू अडीच हजारांचे 3000 करू फक्त तुम्ही ताकद द्या असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

बुलढाणा येथील शारदा ज्ञानपीठ च्या मैदानावर लाडकी बहीण योजनेच्या प्रचारा आणि प्रसाराचा अतिविराट असा कार्यक्रम झाला , यावेळी लाडक्या बहिणींच्या प्रचंड गर्दीला संबोधित करताना मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. यावेळी मंचावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, पालकमंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार किरण सरनाईक, आमदार वसंत खंडेलवाल, आमदार डॉ.राजेंद्र शिंगणे, आमदार संजय कुटे, आमदार संजय रायमुलकर,आमदार संजय गायकवाड, आमदार श्वेताताई महाले, आमदार आकाश फुंडकर यांची उपस्थिती होती.

 पुढे बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, बुलडाणा येथे आलो की आपल्या घरी आल्यासारखं वाटत.यावेळी शहरात उभारण्यात आलेल्या स्मारकांच्या कामाबद्दल मुख्यमंत्री शिंदे यांनी आ.गायकवाड यांचे कौतुक केले.
राज्याचा मुख्यमंत्री झाल्यानंतर जेव्हढा आनंद झाला नाही त्यापेक्षा आनंद लाडक्या बहिणींच्या चेहऱ्यावरील समाधान पाहून आनंद झाला असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. तुमच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून ही योजना सुपरहिट झाल्याचे कळते, ही योजना रेकॉर्डब्रेक झाली आहे असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
 
विरोधकांना सुनावले...
या योजनेला विरोधकांनी विरोध केला. काँग्रेस आमदार सुनील केदार यांनी आमचं सरकार आल की योजना बंद करू असं विधान केलं, लाडक्या बहिणींचा अपमान करतांना तुम्हाला जनाची नाही तर मनाची लाज वाटली पाहिजे असे मुख्यमंत्री शिंदे विरोधकांना उद्देशून म्हणाले. एवढ्या लवकर योजनेचा लाभ खात्यात जमा होणारी ही पहिली ऐतिहासिक योजना आहे .हे सरकार देणारे सरकार आहे, आतापर्यंत असलेले सरकार घेणारे होते, आमचे सरकार देणारे असल्याचा आम्हाला अभिमान आहे असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
काँग्रेसने देशात ६० वर्षात वाटोळं केलं, विरोधकांचे खाते कायमंच बंद करा. विरोधकांनी या योजनेत घोडा घालण्याचे काम केले त्या विरोधकांना माझ्या बहिणी धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. 
योजनेसाठी ३३ कोटी हजार बाजूला काढले...
३३ हजार कोटी रुपये या योजनेसाठी आम्ही बाजूला काढलेले आहे. ही योजना कायम सुरू राहिलं. ही योजना दीड हजारांवर थांबवणार नाही, तुम्ही ताकद वाढवली तर दीड हजाराचे दोन हजार ,दोन हजाराचे अडीच हजार, अडीच हजाराचे तीन हजार होतील असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. आम्ही गरिबी अनुभवली आहे. मी सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा आहे, आई कशी काटकसर करायची हे मी अनुभवले आहे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.राज्याची नमो शेतकरी योजना , केंद्राची पीएम किसान सन्मान योजना या योजनेसह विविध योजनांचा मुख्यमंत्री शिंदे यांनी पाढा वाचला.
Advt.

 

  २४७ मध्ये भारताला विकसित भारत बनवण्याचे स्वप्न पंतप्रधान मोदी यांनी बघितलेले आहे. ते स्वप्न पूर्ण होणार आहे, लाडक्या बहिणी आर्थिक सक्षम होणार आहेत. त्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे.
  महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात उद्योग येत आहेत. लाडक्या भावासांठी देखील योजना आणल्या आहेत, अशी योजना राबविणारे आमचे देशातील पाहिले सरकार आहे असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.आम्ही जे बोलतो ते करतो, जे होईल तेच बोलतो, जे कागदावर राहील ते आम्ही बोलत नाही असे मुख्यमंत्री म्हणाले. ही योजना मतासांठी नाही तर बहिणींची पत वाढवण्यासाठी आहे असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. बहिणीवर अत्याचार करणाऱ्या नराधम करणाऱ्याला फाशीची शिक्षा दिल्याशिवाय आमचे सरकार स्वस्थ बसणार नाही, हे महिलांची सुरक्षा करणारे सरकार आहे असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
आमदार संजय गायकवाड यांचे तोंडभरून कौतुक...
आपल्या भाषणातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार संजय गायकवाड यांचे तोंड भरून कौतुक केले. एवढ्या मोठ्या संख्येत स्मारकांची उभारणी केल्याबद्दल मी आमदार संजय गायकवाड यांना धन्यवाद देतो असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. या कामाबद्दल मी आमदार गायकवाड यांचे अभिनंदन करतो असेही ते म्हणाले.
संविधान बदलणार नाही...
  लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी संविधान बदलणार, आरक्षण संपवणार अशी भीती दाखवली. मात्र जब तक सुरज चाँद रहेगा तोपर्यंत आरक्षण कुणीही बंद करू शकत नाही संविधान कुणी बदलू शकत नाही असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. राहुल गांधी यांनी आरक्षण बंद करण्याची भाषा केली. त्यांचे खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे आहेत असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. विरोधकांना योग्य वेळी जागा दाखवली पाहिजे असेही ते म्हणाले केंद्रात मोदी सरकार आणि राज्यात महायुती सरकार हे डबल इंजिनचे सरकार असल्याने राज्याचा चौफेर विकास सुरू आहे असे ते म्हणाले. राज्य आणि केंद्रात समविचारी सरकार असले की राज्याचा विकास चौफेर होते, एकही योजना बंद होणार नाही, तुम्ही चिंता करण्याची आवश्यकता नाही असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
Advt.

 

येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत या योजनांना विरोध करणाऱ्यांना लाडक्या बहिणी धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही,हिशोब घेतल्याशिवाय राहणार नाही असे मुख्यमंत्री शिंदे शेवटी म्हणाले.