सौरगाव म्हणून होणार चांडोळ गावाची ओळख! आ. श्वेताताईंच्या प्रयत्नातून साकारले सोलार पार्क ; २० कोटींची गुंतवणूक! १६४८ शेतकऱ्यांचे हिरवे स्वप्न साकार होणार...
Apr 19, 2025, 08:38 IST
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): वीज निर्मिती करताना विजेची मागणी व विजेचा पुरवठा यात संतुलन घालता यावा म्हणून शेतकऱ्यांना अर्धवेळ रात्रीच्या वेळी वीज उपलब्ध करून दिली जात असे. परंतु रात्रीच्या वेळी शेतीला पाणी देताना अनेक वेळा शेतकऱ्यांना अनेक संकटाला तोंड द्यावे लागत असे. कधी बिबट्याचा हल्ला कधी कोल्ह्यांचा हल्ला, कधी सर्पदंश झाल्याने होणारे मृत्यू यामुळे मायबाप शेतकऱ्यांच्या जीवनात येणाऱ्या असंख्य अडचणींना जाणून दूरदर्शी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१७ मध्ये सौर कृषी वाहिनी योजना सुरू केली होती. पुन्हा मुख्यमंत्री झाल्यानंतर फडणवीस यांनी सौर कृषी वाहिनी योजना २.० योजनेला आपल्या प्रशासनाची एक महत्त्वपूर्ण योजना जाहीर करून महाराष्ट्रात स्थापन झालेले महायुतीचे सरकार हे प्रामुख्याने शेतकरी व कष्टकरी लोकांची काळजी करणारे शेतकरी केंद्रित सरकार असणार असल्याचे अप्रत्यक्षपणे जाहीरच करून टाकले.रात्रीच्या वीज पुरवठ्यामुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असून दिवसा शेतकऱ्यांना विश्वासार्ह वीज पुरवठा मिळावा अशी मागणी अनेक दिवसांपासून होत असून आपल्या मतदारसंघातील लोकांची ही मागणी पूर्ण करू शकत असल्याचे समाधान आपल्याला आहे, असे उद्गार आमदार श्वेताताई महाले यांनी चांडोळ येथे सोलर पार्कचे लोकार्पण करताना काढले.
ग्रामीण भागातील जनतेला विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० राबवली जात असून चिखलीच्या आमदार विकास कन्या श्वेताताई महाले यांच्या विशेष प्रयत्नांतून चांडोळ येथे मंजूर सोलर पार्क सुरू करण्यात आला.
या पार्कची विद्युत निर्मिती क्षमता पाच मेगावॅट असेल आणि यासाठी २० कोटी रुपयांची गुंतवणूक शासनाने केली आहे. परिसरातील १६४८ शेतकऱ्यांना सौर प्रकल्पाचा लाभ होणार आहे. महाराष्ट्र शासनाचा ऊर्जा विभाग व महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या वतीने हा सोहळा आयोजित करण्यात होता.
सौर पार्कमधून निर्माण होणाऱ्या ऊर्जेचे पर्यावरणासाठी अनेक फायदे असून त्यामधून स्वच्छ ऊर्जा प्राप्त होईल. सौर पार्क जीवाश्म इंधनांचा वापर कमी करतो त्यामुळे हानिकारक वायूंचे उत्सर्जन होत नाही. ज्यामुळे हवा शुद्ध राहते. सोलर पार्कमधून निर्माण होणारी ऊर्जा ही पर्यावरण पूरक असते. सौर ऊर्जा नैसर्गिकरित्या उपलब्ध आहे. त्यामुळे तिची निर्मिती करताना पर्यावरणावर नकारात्मक परिणाम होत नाही.
एकदा सौर पार्क स्थापित झाल्यावर, वीज निर्मितीचा खर्च कमी होतो, कारण सौर ऊर्जा मोफत उपलब्ध आहे. सौर पार्क ऊर्जा निर्मितीमध्ये देशावर अवलंबून न राहता, स्वतःची ऊर्जा निर्मिती करू शकतो, ज्यामुळे ऊर्जा सुरक्षा वाढते. त्याचप्रमाणे सोलार पार्कचे अन्य सामाजिक फायदे ही आहेत. सौर पार्कच्या उभारणीत आणि देखभालीत अनेक लोकांची रोजगाराची संधी निर्माण होते. सौर ऊर्जा ग्रामीण भागांमध्ये वीज पुरवण्यासाठी मदत करते, ज्यामुळे तेथील लोकांचे जीवनमान सुधारते, असे श्वेताताई महाले यावेळी सांगिते.
या सोहळ्यास देविदास जाधव, ओमसिंग राजपूत, डॉ. तेजराव नरवाडे, श्रीरंगअण्णा वेंडोले, चव्हाण, महावितरण कार्यकारी अभियंता, ॲड.मोहन पवार, नीलेश देठे, सतीश भाकरे, प्रताप मेहर, योगेश राजपूत, विष्णू पाटील वाघ, दिगंबर जाधव, विशाल विसपुते, राजू चांदा, सुरेश धनावत, गजानन देशमुख, पुरुषोत्तम भोंडे, अनिल जाधव, अनिल अपार, सखाराम नेमाडे, विष्णु उगले उपस्थित होते.