बुलडाणा लोकसभा:पक्षांचे 'पंख' कमजोर!अपक्षाचा वाढणार जोर! ज्येष्ठ पत्रकार विजय देशमुख लिहीतात...यावेळची ही फक्त निवडणूक नाही,कर्मयुध्द आहे कर्मयुध्द... ! 
                     

 
बुलडाणा (विजय देशमुख:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): पक्षाने उमेदवार निवडण्यावरच निवडणूकीतील अर्धे यश-अपयश ठरत असते!असे म्हणतात.हे ज्ञात असूनही पक्षस्तरावर ढिसाळपणा दाखवला जात असतो.आपल्या पक्षाचा उमेदवार निवडतांना राजकीय पक्ष कोणते निकष लावतात? उमेदवारी मागणाराला काही कसोट्यातून जावे लागते का?मतदारांच्या मनातील अपेक्षित उमेदवार निवडला जातो का?निवडून येण्यासाठीचे कोणते गुणविशेष तपासले जातात? मतपेढी भरभरून घेऊन विजयश्री खेचून आणण्यास तो सक्षम वाटतो का?अशा अनेकविध बाबी विचारात घेऊन,सर्वंकष विचाराने पक्षस्तरावर उमेदवार ठरवला जात असेल.अशी भाबडी समजूत लोकशाहीच्या उत्सवातील मतदारराजाची असते.आपल्यावर कदापिही उमेदवार लादला जाऊ नये अशीही मतदारांची मूलभूत अपेक्षा असते.जातीपातीच्या मतांचं समिकरण व धनशक्तीच्या जोरावर इच्छूक हा पक्षाकडून उमेदवारी पदरात पाडून घेत असतो. ज्या मतदारांच्या भरवशावर निवडणूकीचा कौल ठरणार असतो त्याच्या भावना मात्र उमेदवार ठरवताना दुर्लक्षिल्या जातात.आजवर हेच चालत आले आहे.पण आता मतदार सजग झाला आहे.लादलेल्या उमेदवाराचा टांगा पलटी करण्याची ताकद मतदारांना ठावूक असते.मतदारांना गृहीत धरण्याचा पक्षांचा अविचारीपणा आता खपवून न घेण्याची भाषा मतदार राजा बोलू लागला आहे.आपल्या एका मताचे मूल्य कळून येणे हे मतदारांच्या प्रगल्भतेचे लक्षण आहे."नशिब" नेहमीच साथ देत नसते आणि मतदार पुन्हा चुक करत नसतात' एवढे ध्यानात आले तर आजमितीस वारे कुणीकडे वाहत आहे, यांचा अंदाज येईल.
निवडणूका आल्यावरच प्रगट होणारे, सार्वजनिक क्षेत्रात संकुचित वावर असलेले ,लोकांना अपेक्षित नसलेले, लादले गेलेले उमेदवार निवडणूक मैदानात कोणता पराक्रम दाखवू शकतात? धनशक्ती विरूद्ध जनशक्ती अशा टिपीकल टैगलाईनच्या लढती आता दिसायला लागतील.जे भ्रमात आहेत,मस्तीत मश्गूल आहेत असे उमेदवार ही निवडणूक हलक्यात घेणार असतील तर यावेळी विश्रांतीचा योग त्यांना खुणावत आहे असेच म्हणता येईल.केवळ पक्षांचे निवडणूक चिन्ह पाहून मतपेटी भरण्याचे दिवस सरले आहेत.उमेदवार पाहून,त्याचे कर्तृत्व पाहूनच ईव्हीएम चे बटन दाबण्याची जाण आणि भान मतदारांना आहे.बसल्याजागी मतांची आकडेमोड करून विजयाची स्वप्ने पाहणारे मुंगेरीलाल ४ जूनला खाडकन जागे होतील.तात्पर्य,प्रबळ इच्छाशक्तीवर ,चिकाटीने लढणारा एखादा सामान्यातील अपक्ष उमेदवार हा प्रस्थापित उमेदवारांना धोबीपछाड देऊ शकेल अशी एकूण परिस्थिती दिसू लागली आहे.
 यावेळची ही फक्त निवडणूक नाही.कर्मयुध्द आहे कर्मयुध्द ! उमेदवारांना कार्यकर्तृत्वाचा लेखाजोखा मतदारांपुढे ठेवूनच मते मागावी लागतील. सक्षम अपक्ष उमेदवाराला ताकदीने लढण्यासाठी अनुकूल वातावरण आपसूकच तयार होऊ लागले आहे.यावेळी खासदार कोण हवंय!आणि कोण कोण नकोय! यावरच आतापासून लोकांत चर्चिले जात आहे.निवडणूकीला रंग भरण्यास अवकाश असला तरी लोकभावना अपक्षाचा सूर आळवत आहे.प्रचारकी मेळावे हे फक्त देखावेच ठरण्याची शक्यता आहे.लोकांच्या मनात काय चालले आहे? याचा वेध कोण घेईल? सुरूवातीलाच अर्धी लढाई हरलेल्यांनी हा सतर्कतेचा इशारा समजावा.तूर्त एवढेच.