गुलाल कोणाला लावायचा हे बुलडाणा ठरवणार!; सर्वाधिक मतदार

 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः विधान परिषदेच्या सहा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी १० डिसेंबरला मतदान होणार आहे. अकोला-बुलडाणा-वाशिम मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा असा सरळ मुकाबला आहे. महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे विद्यमान आमदार गोपीकिशन बाजोरिया तर भाजपाकडून उद्योगपती वसंत खंडेलवाल रिंगणात आहेत. या मतदारसंघात ८२२ मतदार मतदानाचा हक्क बजावणार असल्याचे अंतिम मतदारयादी प्रसिद्ध झाल्यानंतर समोर आले आहे. त्यानुसार उमेदवारांकडून मतांची जुळवाजुळव सुरू करण्यात आली आहे.

मतदार यादीवर हरकती मागवण्यात आल्या होत्या. त्यानुसार काल, २३ नोव्हेंबर रोजी अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात आली. अंतिम मतदार यादीनुसार बुलडाणा जिल्ह्यातून सर्वाधिक ३६७ मतदार मतदानाचा हक्क बजावणार  आहेत. अकोला जिल्ह्यातून २८७ तर वाशिम जिल्ह्यातून १६८ मतदार विधान परिषदेचा आमदार निवडणार आहेत. ३८५ पुरुष तर ४३७  स्त्री मतदार आहेत. यापूर्वी जाहीर करण्यात आलेल्या यादीत ८२१ मतदार होते. अंतिम यादीत एका मतदाराची वाढ झाली आहे. हे सर्व मतदार लोकांनी निवडून दिलेले स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी आहेत.
असे आहेत मतदार
अकोला जिल्हा ः जिल्हा परिषद अकोला- ६०, अकोला महानगरपालिका- ८१ , अकोट नगरपरिषद-३६, तेल्हारा नगरपरिषद-१९, बाळापूर नगरपरिषद- २६, पातूर नगरपरिषद-१९, मूर्तिजापूर नगरपरिषद-२६, बार्शी टाकळी नगरपंचायत- २० (एकूण मतदार-२८७)
वाशिम जिल्हा ः वाशिम जिल्हा परिषद-५८, वाशिम नगर परिषद-३४,  कारंजा नगर परिषद-३२,  मंगरुळपीर नगर परिषद-२१,  रिसोड नगरपरिषद -२३ (एकूण मतदार-१६८)
बुलडाणा जिल्हा ः जिल्हा परिषद बुलडाणा - ७१,  बुलडाणा नगरपरिषद -३१,  चिखली नगरपरिषद -३०,  देऊळगाव राजा नगरपरिषद -२१,  सिंदखेड राजा नगरपरिषद -१९,  लोणार नगर परिषद -२०,  मेहकर नगर परिषद-२७,  खामगाव नगरपारिषद -३७,  शेगाव नगरपरिषद -३२,  जळगाव जामोद नगरपरिषद  -२१,  नांदुरा नगरपरिषद -२६, मलकापूर नगर परिषद-३२ (एकूण मतदार- ३६७).

दोन्ही उमेदवारांचे अर्ज दाखल
भाजपातर्फे वसंत खंडेलवाल तर शिवसेनेतर्फे (महाविकास आघाडी) गोपीकिशन बाजोरिया यांनी २२ नोव्‍हेंबरला उमेदवारी अर्ज अकोला जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल केले. भाजपाने कोरोनाविषयक आणि जमावबंदी नियमाचे पालन केले तर महाविकास आघाडीकडून या नियमांना हरताळ फासत शक्‍तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरला. त्‍यांच्‍यावर आता निवडणूक आयोग कोणती कारवाई करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.