BULDANA LIVE SPECIAL आमदार डॉ. संजय कुटेंना प्रदेश उपाध्यक्ष पदावरून का हटवले?
नवी जबाबदारी की दुसरच काहीतरी! भाजपात विनाकारण पदावरून हटवत नाहीत अन् विनाकारण पदावर बसवतही नाहीत! वाचा आमदार डॉ.कुटेंचा मेळ कसा हुकला..
२००४ पासून तर आजपावेतो आमदार डॉ. संजय कुटेंनी जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघात निर्विवाद वर्चस्व निर्माण केले आहे. ऐन निवडणुकीच्या वेळी विरोधी पक्षांत पडलेली फूट देखील वारंवार आमदार डॉ.कुटेंच्या विजयाचे कारण ठरली आहे. देवेंद्र फडणवीसांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात शेवटच्या काही महिन्यांत डॉ.कुटेंना मंत्रीपद मिळाले , बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री पद भूषविण्याची संधी देखील त्यांनी मिळाली. मंत्री म्हणून त्यांनी केलेल्या कामाचेही सर्वच स्तरातून कौतुक झाले.आधी पक्ष संघटनेत प्रदेश सरचिटणीस असणाऱ्या डॉ.कुटेंना प्रदेश उपाध्यक्ष म्हणून बढती मिळाली. महाविकास आघाडी सरकार कोसळत असताना सुरत आणि गुवाहाटीची जबाबदारी देखील फडणवीसांनी विश्वासू डॉ. कुटेंवर सोपवली. देवेंद्र फडणवीसांचे विश्वासू अशी ओळख मिळवल्याने त्यांचा मंत्रिमंडळात मेळ जमेल असे अनेकांना वाटले मात्र तो काही जमला नाही.तत्कालीन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्याने आता प्रदेशाध्यक्ष पद डॉ. कुटेंना मिळेल अशाही चर्चा होऊ लागल्या मात्र तिथे बावणकुळेंनी जमवल्याने तिथेही डॉ. कुटेंचा मेळ हुकला.
प्रदेश उपाध्यक्ष पदावरून डच्चू..आता पुढे काय?
दोन दिवसांपूर्वी भाजपची नवीन महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी जाहीर झाली. प्रदेश उपाध्यक्ष असलेल्या डॉ.संजय कुटेंना या कार्यकारणीतून डच्चू देण्यात आला. मलकापूरचे माजी आमदार चैनसुख संचेतींना प्रदेश उपाध्यक्ष पद देण्यात आले. आधी मंत्रीपद, नंतर प्रदेशाध्यक्षपदाची संधी आणि आता प्रदेश कार्यकारिणीतून हुकल्याने डॉ. कुटेंभोवती संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. भाजपसारख्या पक्षात विनाकारण कुठल्या व्यक्तीला कुठल्या पदावरून काढत नाहीत अन् विनाकारण पदावर बसवत नाहीत असा शिरस्ता आहे. त्यामुळे कुटेंना डावलण्याचे कारण काय असावे? असा प्रश्न निर्माण होणे स्वाभाविक आहे. आमदार कुटेंना दुसरी जबाबदारी देण्यासाठी सध्याच्या जबाबदारीतून मुक्त केले असावे असाही एक अर्थ याप्रकरणातून काढता येऊ शकतो..अर्थात नवी जबाबदारी मिळेपर्यंत जो तो आपापल्या परीने याचे वेगवेगळे अर्थ काढण्यास मोकळा आहे..!